सुपर '30' नव्हे; आता "सुपर-50'!

दीपा कदम
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शिक्षण क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आयआयटीयन्स घडविणाऱ्या बिहारमधील आनंदकुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या "सुपर 30' चित्रपटाच्या कहाणीचा कित्ता आदिवासी विभागही गिरवणार आहे.

मुंबई : शिक्षण क्षेत्रापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आयआयटीयन्स घडविणाऱ्या बिहारमधील आनंदकुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या "सुपर 30' चित्रपटाच्या कहाणीचा कित्ता आदिवासी विभागही गिरवणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमधून डॉक्‍टर आणि अभियंतेही घडावेत यासाठी राज्य सरकारने "सुपर-50' ही विद्यार्थ्यांची बॅच तयार केली असून, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे दहा लाख रुपये, तर 50 विद्यार्थ्यांसाठी पाच कोटी 12 लाख रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. 

"पेस' ही संस्था अभियांत्रिकी आणि वैद्यकीय स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी संस्था असून या संस्थेतर्फे दरवर्षी पंधराशे विद्यार्थी आयआयटी, एम्स, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याचे राज्य सरकारने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. पालघर येथील ग्लोबल स्कूल या निवासी शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण दिले जाणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईई, नीट, एआयईईई या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होता यावे यासाठी या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 

राज्यातील 419 शासकीय आश्रमशाळा, 25 एकलव्य निवासी आश्रमशाळा व 11 इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. महिनाभरापूर्वी या शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दोन टप्प्यांत या संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात आल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्‍लेषण करण्यात आले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 34 जणांची अभियांत्रिकी आणि 16 विद्यार्थ्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 25 विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा दोन वर्षांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च या योजनेंतर्गत केला जाणार आहे. 

अशी आहे योजना 

केंद्र सरकारच्या आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण प्रस्तावांना अनुदान दिले जाते. राज्य सरकारमार्फत जाणाऱ्या या प्रस्तावांमध्ये "आयआयटीयन्स पेस एज्युकेशन'चा (पेस) प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आदिवासी विभागाने आदिवासी आश्रमशाळांतील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षा घेऊन त्यामधून "सुपर-50'ची बॅच तयार केली आहे.

या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी सीबीएसई अभ्यासक्रमासोबत वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षांबाबत निवासी प्रशिक्षण देऊन त्यांना देशातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not super 30 is Time Now Super 50 for Education