esakal | वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : महावितरणने मोबाईल अॅप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यापाठोपाठ आता ‘एसएमएस’द्वारेही मीटर रिडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्मार्ट फोन नसणारे किंवा हाताळण्यात अडचण असणाऱ्या ग्राहकांनाही स्वतःच मीटर रिडिंग पाठविता येईल.

हेही वाचा: बँक खातेदाराचा कोरोनानं मृत्यू झाल्यास मिळणार तब्बल दोन लाख रुपये

कोरोना व टाळेबंदीमुळे अनेक भाग, सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन मीटर रिडिंग घेणे शक्य होत नाही. अडचणीच्या या काळात मोबाईल ॲप व संकेतस्थळाद्वारे स्वतःहून मीटर रिडिंग पाठविण्याची सुविधा वीजग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यात आता एसएमएस सुविधेचीही भर पडली आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रिडिंग स्वीकारण्यात येणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

‘एसएमएस’द्वारे मीटर रिडिंग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहील. वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रिडिंग पाठविल्यास मीटर व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. त्यामुळे वीजवापरावर नियंत्रित ठेवता येईल. रिडिंगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल.

हेही वाचा: 'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

असा करा एसएमएस

महावितरणकडे रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरूनच एसएमएस पाठविता येणार आहे. नोंदणीकृत मोबाईलवरून मीटर रिडिंग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडिंग पाठविणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top