धुरळा शांत...आता निर्णय मतदार राजाकडे! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सातारा - प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष, संघटना व आघाड्यांनी मतदारांपुढे विविध आश्‍वासने मांडली. या आश्‍वासनांचे मतांत परिवर्तन करण्यात कोणता पक्ष किती यशस्वी ठरणार, यावरच जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, कॉंग्रेस आपल्या आहे या जागा गमावणार, की आणखी कमावणार, भाजप, शिवसेना सत्तेत प्रवेश करणार का, याचीच उत्सुकता उरली आहे. 

सातारा - प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष, संघटना व आघाड्यांनी मतदारांपुढे विविध आश्‍वासने मांडली. या आश्‍वासनांचे मतांत परिवर्तन करण्यात कोणता पक्ष किती यशस्वी ठरणार, यावरच जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी होणार का, कॉंग्रेस आपल्या आहे या जागा गमावणार, की आणखी कमावणार, भाजप, शिवसेना सत्तेत प्रवेश करणार का, याचीच उत्सुकता उरली आहे. 

सातारा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना वा भाजपचा जिल्हा परिषदेत सदस्य नाही. अकराही पंचायत समित्यांत राष्ट्रवादीची सत्ता आहे. यावेळेस निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस ही गेली 15 वर्षांची लढत बाजूला पडून राष्ट्रवादी विरोधात भाजप व शिवसेना यांच्यात लढत होत आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचाराने वेग घेतला. जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक पक्ष व त्यांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. मतदारांपर्यंत आपल्या पक्षाचे जाहीरनामे, वचननामे पोचविताना यातून मतदारांवर आश्‍वासनांची खैरात झाली. ग्रामीण भागातील मतदार राजाने प्रत्येक पक्ष व त्यांच्या उमेदवारांची प्रेमळ भाषा अनुभवली. आता या प्रेमातून उतराई होण्याची वेळ आली आहे. मतदार आता आपल्या मतांच्या अधिकारातून खरोखरच कोणता पक्ष जिल्हा परिषदेची सत्ता संभाळण्यास सक्षम आहे, हे दाखवून देणार आहे. 

जिल्हा परिषदेतील गेल्या 15 वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत केलेली विकासकामे व त्यातून जनतेचा झालेला विकास हे चित्र राष्ट्रवादीने प्रचारातून मतदारांपुढे मांडले. हे मांडताना उर्वरित विकासासाठी पुन्हा राष्ट्रवादीकडेच सत्ता देण्याची अपेक्षा ठेवली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता आहे; पण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत सत्ता नसल्याने या सत्तेतून विकासकामे करताना भारतीय जनता पक्षाला अडथळे येत आहेत. हे अडथळे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस असून यांना सत्तेतून बाजूला करून केंद्र व राज्यातून येणारा विकासकामांसाठीचा निधी थेट जनतेपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले आहे. शिवसेनेनेही थोडीफार भाजपसारखीच भूमिका घेत मतदारांना विविध विकासकामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन देत सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या हातात देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी मतदारांसाठी वचननामा प्रसिद्ध केला आहे. हे सर्व ऐकून आता मतदार राजा आपला निर्णय मतदान यंत्रणात बंद करण्याची मानसिकता तयार करत आहे. आता मतदार कोणाच्या आश्‍वासनांना व जाहीरनाम्यांना साथ देणार, यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. 

उत्सुकता शिगेला 
राष्ट्रवादीकडून एकच ध्यास..साताऱ्याचा चौफेर विकास...हे वचन दिले आहे. निवडा धनुष्य...घडवा भविष्य..असे वचन शिवसेनेचे असून, विधिमंडळ ते ग्रामपंचायत एकच सरकार...हा भाजपचा दावा आहे. या आव्हानांना मतदार भुलणार की, आपल्या मनातले सरकार आणणार, याचीच उत्सुकता आहे.

Web Title: Now the voters to decide