राज्यात पावसाला पोषक हवामान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

- विदर्भात थंडीची लाट 
- उर्वरित राज्यात कडाका कमी 

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम असल्याचे दिसून आले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर गुरुवारपासून (ता. १४) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

उत्तरेकडील पश्चिमी चक्रावाताची स्थिती पूर्वेकडे सरकत आहे. त्यामुळे काेकण, मध्य महाराष्ट्रात वाढलेला कडाका कमी होऊन विदर्भात थंडी वाढली आहे. राज्याच्या उत्तर भागात मात्र अद्यापही गारठा टिकून आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस, विदर्भातील नागपूर येथे ७.६ अंश सेल्सिअस, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. विदर्भात अनेक तापमान १० अंशांच्या असपास असून, ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे थंडीची लाट कायम आहे. 

वाऱ्यांच्या प्रवाह होणारे बदल, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे आज (ता. १२) कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये, तर उद्या (ता. १३) धुळे, नाशिक, नगर, पुण्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

सोमवारी (ता. ११) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.६ (-१.२), नगर ८.५ (-४.१), जळगाव ११.६ (-२.०), कोल्हापूर १७.१ (०.९), महाबळेश्‍वर १४.० (-०.२), मालेगाव १०.४ (-१.२), नाशिक १०.२, सांगली १३.८ (-१.९), सातारा १३.० (-१.२), सोलापूर १९.९ (१.९), सांताक्रूझ १५.४ (-२.४), अलिबाग १६.५ (-१.४), रत्नागिरी १६.७ (-२.६), डहाणू १४.१ (-३.७), आैरंगाबाद १२.४ (-१.२), परभणी १३.२ (-३.०), नांदेड १३.५ (-१.८), अकोला १०.८ (-५.१), अमरावती ११.४ (-५.३), बुलडाणा १३.६ (-२.६), ब्रह्मपुरी ९.३ (-६.२), चंद्रपूर १४.० (-२.७), गोंदिया १०.० (-५.३), नागपूर ७.६ (-७.९), वर्धा ११.५ (-३.५), यवतमाळ १३.० (-४.२).

Web Title: Nutritional Weather for the Rain in the state