"OBC आरक्षणासकट येणाऱ्या निवडणुका होणार"; हसन मुश्रीफ म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif

"OBC आरक्षणासकट येणाऱ्या निवडणुका होणार"; हसन मुश्रीफ म्हणाले...

मुंबई : राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या आरक्षणासंदर्भातील काम जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. त्याबरोबर येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणासकट होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. नव्या सरकारच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माध्यमांना बोलत होते.

(OBC Political Reservation Updates)

आम्ही ओबीसी आरक्षणाची लढाई सध्या लढत आहोत, राज्यात जरी नवीन सरकार आलं असलं तरी आम्ही त्याच्यावर बाहेरून लक्ष ठेवून आहोत, आमचे वकील यासाठी तयार असणार आहेत. आरक्षणासाठी आम्ही फार मोठी मेहनत घेतली आहे आणि यासंदर्भात आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: बंडखोर आमदारांची हेरगिरी प्रकरण; राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांना जामीन

आजच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवारांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं आहे आणि दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जावं लागणार आहे, या निवडणुकाच्या तयारीला लागा अशा सूचना शरद पवारांनी या बैठकीत दिल्या आहेत. दरम्यान येत्या सहा महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकासाठी आपण सर्वांनी तयार राहा असं सूतोवाच शरद पवारांनी आजच्या बैठकीत केलं आहे.

"येणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासकट होतील यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आरक्षणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचं काम जवळपास पूर्ण झालं आहे." असा विश्वास राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि हसन मुश्रिफ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन; म्हणाले...

दरम्यान, आज नव्या सरकारसाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली असून त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत शिंदे फडणवीस सरकारकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये भाजपच्या नार्वेकरांना १६४ तर साळवी यांनी फक्त १०७ मतं मिळाली होती. नार्वेकरांची महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभागृहात भाषणं करताना अनेक विरोधक नेत्यांनी नव्या सरकारवर फटकेबाजी केली. तर उद्या या नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.

Web Title: Obc Political Reservation Hasan Mushrif Chhagan Bhjbal Sharad Pawar Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top