Chhagan Bhujbal on OBC Reservation I भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली, भुजबळ संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political

आम्ही मागताना इम्पिरिकल डाटा दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते

'भाजपने महाराष्ट्रासाठी रचलेली खेळी देशाला महागात पडली'

ओबीसी आरक्षणा संदर्भात महाराष्ट्राला दिलेले आदेश मध्य प्रदेशालाही लागू करण्यात आले आहेत. न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारचा अहवाल फेटाळून लावला असून निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. (Supreme Court on OBC Reservation) ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) रखडलेल्या निवडणुकांबाबत मध्य प्रदेशच्या निकालानंतर याबाबत रणनीती ठरवण्याचा राजकीय नेत्यांचा विचार होता. मात्र संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या निकालावर न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, यांसदर्भात आता राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया येते आहेत. महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी न्यायालयात जाऊन खेळ केला आणि तो संपूर्ण देशाला महागात पडला, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लागवला आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, संपूर्ण देशात कोणत्याही राज्याने आरक्षणाबाबतची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण केलेली नाही. केवळ महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोर्टात जाऊन हा खेळ केला असून त्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. आम्ही मागताना इम्पिरिकला डाटा दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा: पाकमधील खासदाराच्या तिसऱ्या पत्नीने मागितला घटस्फोट

आरक्षणप्रकरणी विरोधकांनी डबल गेम खेळायचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र अडचणीत आणून मध्य प्रदेशाला सांभाळायचे काम सुरु आहे. आम्ही चुका दुरुस्तीसाठी डेटाची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत होते की, डेटामध्ये चुका आहेत त्यामुळे तो देता येणार नाही. ते आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं. आता मध्य प्रदेशानेही तेच केलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत संपूर्ण देश अडचणीत आणण्याची भाजपला गरज नव्हती. मातृसंस्था असलेले आरक्षण संपवलं पाहिजे असं सांगतात मात्र मार्ग आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

आरक्षण ही केंद्राची जबाबदारी आहे. राजकारणसाठी देशाचे ओबीसी आरक्षण संकटात आले आहे. ते वाचवायचे असेल तर वकिलांशी बोलावे लागणार आहे. अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना विनंती करतो की दिल्लीत जाऊन यावर मार्ग काढा. भाजपचे लोक सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रच्या विरोधात गेले. राज्यसरकारसाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी खड्ड्यात गेले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात

ओबीसी आरक्षण मिळत नाही ते भारत सरकारचे पाप आहे. आम्ही सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. आता एकच मार्ग आहे. भारत सरकारने अध्यादेश काढणे. देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे लागणार असून त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आरक्षणाचे श्रेय तुम्ही घ्या मात्र भाजपने यात पुढाकार घ्यावा, असंही भुजबळांनी सुचवलं आहे.

Web Title: Obc Reservation Madhya Pradesh Chhagan Bhujbal Criticized Bjp On Empirical Data

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top