ओबीसींच्या असंतोषाचे नायकत्व कोणाकडे?

OBC Morcha In Ambad
OBC Morcha In Ambad
Summary

ओबीसी केंद्रबिंदू ठरत, प्रथमच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यातून राजकीय प्रक्रिया नव्या पद्धतीने आकार घेणार आहेत.

राजकीय पक्षांच्या सीमा ओलांडून ओबीसी नेत्यांनी एकवटणे, ही महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची नांदी ठरणार आहे. ओबीसी केंद्रबिंदू ठरत, प्रथमच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यातून राजकीय प्रक्रिया नव्या पद्धतीने आकार घेणार आहेत. ‘काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. बरं झालं, हा निकाल आला. ओबीसी समाज पुन्हा एकत्र आला. रस्त्यावर उतरला’, हे वाक्य ओबीसी परिषदेमध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवले. नव्याने तयार झालेले हे 'पॉलिटिकल कॅपिटल' प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक नेत्याला हवे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपूर्ण समाजाला मोठा धक्का बसला आणि राज्य पातळीवर एक आवाज तयार झाला. याचाच पुढचा भाग म्हणजे लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय, सर्वपक्षीय ओबीसी परिषद. राज्याच्या कानाकोपऱ्यातील, सर्व स्तरातले लोक या परिषदेस उपस्थित होते.

OBC Morcha In Ambad
शेजार्यांना उपद्रव असेल तर पक्ष्यांना दाणे बंद - न्यायालय

ओबीसी म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे. मात्र, या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही. कारण, तसे झाल्यास या ओबीसी नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असेही दुखणे आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची खंत तर जगजाहीर आहे. ‘ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते’, असे विजय वडेट्टीवारांना वाटते. भाजपमध्ये ओबीसींची मोठी कोंडी झाल्याचा मुद्दा मांडला जाताना, इतर पक्षांमध्येही स्थिती फार वेगळी नसल्याचेही गाऱ्हाणे पुढे आले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघेही ओबीसी प्रश्नाच्या निमित्ताने ‘ब्लेम गेम' करत असले तरी भाजपने भ्रमनिरास केल्याची भावना ओबीसी समुदायात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, भाजपमधील ओबीसी नेत्यांविषयी सार्वत्रिक सहानुभूती आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा नेत्यांचे भाजपमध्ये जे झाले, त्यामुळे भाजपविषयीची नाराजी ठळक झाली आहे. नाना पटोले यांनी या परिषदेत बावनकुळेंना जे चिमटे काढले, त्यातून ते स्पष्ट झाले. बावनकुळेंना उमेदवारी नाकारली गेली, त्यावर पटोलेंनी भाष्य केल्यावर बावनकुळेही काही बोलू शकले नाहीत. पटोलेंचा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता.

OBC Morcha In Ambad
प्रदुषित भागात कोरोनाचे अधिक रुग्ण; पुणे, मुंबई संवेदनशील शहरे

सर्वपक्षीय नेते ओबीसी परिषदेच्या निमित्ताने एकवटले हे खरे, पण मुद्दा प्रामुख्याने त्यांच्या व्यक्तिगत राजकीय आकांक्षांचा असल्याचे स्पष्ट झाले. आपापल्या पक्षातले स्थान उंचावण्याची संधीही त्यांना या निमित्ताने घेता येणार आहे. त्याचवेळी या लढाईतही महिलांना मागच्या बाकांवर ठेवले गेल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

ओबीसी समुदायामध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाचा नायक कोण होणार, ही खरी व्यावहारिक स्पर्धा आहे. पटोले आणि भुजबळ सरकारमध्ये सोबत असले, तरी त्यांच्यातील स्पर्धात्मकताही या परिषदेच्या निमित्ताने जाणवली. विजय वडेट्टीवारांकडे ओबीसींचा नवा चेहरा म्हणून पाहिले जात आहे, हेही जाणवण्याइतके ठळक होते. अर्थात, आज एकत्र आलेले हे समविचारी मित्रच उद्या परस्परांचे खरे स्पर्धक असणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यातून महाराष्ट्राचे राजकारण बदलल्याची चाहूल लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com