1 मे रोजी अख्खे उच्च न्यायालय सोलापुरात! 125 पूर्वीची ब्रिटिशकालिन इमारत अपुरी; जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतच्या भूमिपूजनाला मुख्य न्यायमूर्तींसह 5 न्यायमूर्तींची उपस्थिती

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची सव्वाशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्रशस्त इमारत उभारली जाणार असून, या कामाचा पायाभरणी शुभारंभ १ मे रोजी होणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासह पाच न्यायमूर्तींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
solapur district court
solapur district courtsakal

सोलापूर : सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाची सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन इमारत वाढत्या न्यायालयीन कामकाजामुळे अपुरी पडत आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी प्रशस्त इमारत उभारली जाणार असून, या कामाचा पायाभरणी शुभारंभ १ मे रोजी होणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासह अन्य पाच न्यायमूर्तींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सोलापूर वकील संघाकडून विधी व न्याय खात्याकडे २०१४ पासून नव्या इमारतीसंदर्भात पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून, नोव्हेंबर २०२२ मध्ये परिपत्रक जारी करून १०८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली. अंदाजपत्रकात तरतूद करून निविदा प्रक्रिया अंतिम झाली आहे. आता इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होणार असून त्याचा पायाभरणी समारंभ महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, सोलापूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, सोलापूरचे भूमिपूत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार, न्यायमूर्ती विनय जोशी व पालक न्यायमूर्ती फिरदोस पुनीवाला, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम.एस. अझमी हे उपस्थित असणार आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी दिली.

इमारतीतील सुविधा व रचना...

  • नूतन इमारतीमध्ये २५ प्रशस्त कोर्ट हॉल असणार

  • महिला वकिलांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल

  • जिल्हा न्यायालयातील वकिलांसाठी बार रूम, टी क्लब, पोस्ट ऑफिस, ए‌.टी.एम., लायब्ररीची सुविधा

  • इमारतीत महिला पक्षकारासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे

  • कौटुंबिक, सहकार न्यायालय, शाळा न्यायाधिकरण, कामगार व औद्योगिक न्यायालय अशी सर्व न्यायालये एकाच छताखाली असणार

सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहावे

सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी जिल्हा न्यायालयाची नूतन वास्तू असणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, न्यायिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे.

- ॲड .सुरेश गायकवाड, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com