मुंबई - ठेकेदारांच्या लाडक्या महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी, ज्या त्या जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका स्पष्ट करायला लावू. तसेच अधिकऱ्यांनी केलेल्या मोजणीच्या खुणा बुजवून त्या अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवून दिला जाणार नाही,’ असा इशारा देतानाच ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’ चा नारा बुधवारी शेतकऱ्यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चात १२ जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. यात कोल्हापूरसह, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता.
शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे आमदार सतेज पाटील यांनी त्याचे नेतृत्व केले. सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेचार पर्यंत शेतकऱ्यांनी आझाद मैदान सोडले नाही. ‘शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’ या घोषणांनी शेतकऱ्यांनी आझाद मैदान दणाणून सोडले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये एका भाषणात शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले. माझा शब्द म्हणजे शब्द, दिलेला शब्द कधीही परत घेत नाही असे छातीठोकपणे सांगणारे शिंदे आता मात्र काहीही बोलत नाहीत.’ शिंदे यांच्या भाषणातील ध्वनिफीत त्यांनी यावेळी उपस्थितांना ऐकवली. शिंदे यांनी जाहीर करूनही हा महामार्ग रद्द होत नाही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांचे ऐकत नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ करा म्हणून मागणी केलेली नाही. तरीही, सरकार हा रस्ता करत आहे. राज्यात असे अनेक रस्ते आहेत, जे मागणी नसताना होत आहेत हा एक चमत्कार आहे.
अशा अनावश्यक महामार्गांची कामे काढायची आणि ‘पक्षनिधी’ उभा करायचा हा नवा मार्ग महायुती सरकारने अवलंबला आहे. कंत्राटदाराना पोसण्याची ही नवी साखळी आहे. यामध्ये ठराविक सहा जणांना कामे दिली जात आहेत.’
तुम्ही शेतकरी याला विरोध करणार असाल तरच आम्ही यात पुढाकार घेतो,’ असे पाटील म्हणतातच शेकडो शेतकऱ्यांनी समर्थन देत शक्तिपीठ महामार्ग विराधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी, दिलीप सोपल, माजी आमदार के. पी. पाटील, कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे उपस्थित होते. मोर्चाताल शेकडो शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था मुंबई येथे असणाऱ्या कोल्हापूरच्या व्यावसायिकांनी केली होती.
अशी असणार पुढील रणनीती
शक्ती पीठ महामार्ग विरोधात लातूरला ८ एप्रिलला मेळावा
ज्या-त्या जिल्ह्यातील आमदार, खासदार व मंत्र्यांना शक्तिपीठाबाबत भूमिका विचारणार
प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी मेळावे घेणार
सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडे फडकवणार
शिंदे आता गप्प
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘महायुती सरकार हे कंत्राटदार धार्जिण आहे. शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना कुणाचे तरी वाळू सिमेंट खपवण्यासाठी या महामार्गाचा घाट घातला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जो गरजेचा रस्ता आहे त्याला कोणी विरोध करत नाही.
मात्र हा रस्ता नको म्हणत असतानाही सरकार हा रस्ता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर लादत आहे. ठेकेदाराला हवे असणारे कामच हे सरकार करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तिपीठ रद्द झाल्याची घोषणा केली. पण आता शिंदे यांच्याकडेच सध्या या विभागाचे खाते असताना तो रद्द करण्याबाबत कोणताही शब्द काढत नाहीत.’
सध्याचे सरकार टक्केवारीवर चालते. सध्या नऊ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर राज्यावर आहे. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली त्यांनी शेतकऱ्यांशी ही गद्दारी केली आहे.
- विजय वड्डेटीवार, काँग्रेसचे गटनेते, विधानसभा
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देऊ नका. दमदाटी करणाऱ्यांना आडवे करा. जमीन मोजणी केली असेल तर त्या खुणा बुजवा.
- राजू शेट्टी, माजी खासदार
गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याला विरोध केला जात असताना याची फिकीर नाही.
- विश्वजित कदम, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.