जागतिक दर्जाच्या होणार शंभर शाळा

जागतिक दर्जाच्या होणार शंभर शाळा

पुणे - राज्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचा अभ्यास शिकता यावा म्हणून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे पाऊल पुढे पडले आहे. वर्षभरात या दर्जाच्या शंभर शाळा करण्याचे उद्दिष्ट असले, तरी त्यासाठी सुमारे पाच हजार शाळा इच्छुक आहेत. त्यातील ४५५ शाळांची पाहणीसाठी निवड करण्यात आली आहे. पाहणीअंती त्यांच्याकडील पायाभूत सुविधा आणि बौद्धिक कौशल्य असणारे मनुष्यबळ यांचा विचार करून त्यांना या बोर्डाची संलग्नता दिली जाणार आहे.

राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी १३ शाळांची निवड केली होती. त्यांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय बोर्डाची संलग्नता आहे. पुणे जिल्ह्यात शिरूरमधील वाबळेवाडी येथील एका शाळेचा त्यात समावेश आहे. सध्या मराठी माध्यमाच्या शाळा निवडल्या जात आहेत. पुढील वर्षभरात अन्य माध्यमांच्या शाळांना या बोर्डाची संलग्नता दिली जाणार आहे. या बोर्डाच्या शाळांसाठी सुरवातीला पूर्वप्राथमिक ते तिसरीपर्यंत अभ्यासक्रम तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार केला जाईल.

या बोर्डाच्या संचालकपदाचा कार्यभार हा सध्या बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याकडे आणि सचिवपदाचा कार्यभार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांच्याकडे आहे.
डॉ. मगर म्हणाले, ‘‘वैश्‍विक विषय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्‍यक घटक हा या बोर्डाच्या अभ्यासक्रमातील गाभा आहे. या बोर्डाबरोबर जोडण्यासाठी शाळांची संख्या वाढत असली, तरी त्यांच्या मनुष्यबळाची दर्जात्मक वाढ करण्याची मानसिकता, कष्ट करण्याची तयारी पाहून त्यांना संलग्नता दिली जाणार आहे.’

अभ्यासक्रम निर्मितीमध्ये तज्ज्ञांचे योगदान
बोर्डाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष हे शिक्षणमंत्री विनोद तावडे 
आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रात वेगळे प्रयोग करणारे सोनम वांगचूक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर त्यात आहेत. अभ्यासक्रम निर्मितीमध्ये या तज्ज्ञ मान्यवरांचे योगदान असेल. 
त्यामुळे बोर्डाचा अभ्यासक्रम हा दर्जेदार तयार होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमात विज्ञानापासून वैश्‍विक ज्ञानापर्यंत असा विषयांचा पल्ला असेल. सर्व विषय हे मराठी भाषेतून असतील. कारण मातृभाषेतून शिक्षण, हेच परिणामकारक असते. मात्र, त्याला इंग्रजी संभाषणाचेही धडे दिले जाणार आहेत.
- डॉ. सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com