
इतर राज्यातील ३ हजार ५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची केली उचल
‘एक देश एक रेशनकार्ड’ने ‘करून दाखविले’
पुणे - केंद्र सरकारच्या ‘एक देश एक रेशनकार्ड’ या योजनेतंर्गत गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील ६ हजार ३२० शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली असल्याचे समोर आले. तर इतर राज्यातील ३ हजार ५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे. त्यामुळे ही योजना मजुरांना फायद्याची ठरत असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजनेंतर्गत एक वर्षात राज्यातील ९४.५६ लाख शिधापत्रिकाधारकांनी जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे अन्नधान्याचा लाभ घेतला आहे. स्वस्त धान्य दुकानात आधार प्रमाणिकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही स्वस्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात धान्य उचलण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते.
योजनेची सुरुवात २०१८ मध्ये ‘इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम’ (आयएम- पीडीएस) म्हणून करण्यात आली आहे.
हेही वाचा: राज्यातील बार नुतनीकरण रेंगाळत, अद्याप कोणताही निर्णय नाही
योजना फायदेशीर का?
ऑगस्ट २०१९ मध्ये २ क्लस्टर्सच्या स्वरूपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगण या चार राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली आहे. या दोन क्लस्टर्स पैकी एका क्लस्टरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते. जानेवारीपासून या योजनेची व्याप्ती वाढत महाराष्ट्रासह १२ राज्यात करण्यात आली. त्यामुळे डिसेंबर २०२० पासून एकूण ३२ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील कोणताही ‘एनएफएसए’ कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. कामासाठी मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून मजूर महाराष्ट्रात येतात आणि स्थायिक होतात. कोरोनामुळे अनेक कामगारांनी आणि मजुरांनी पुन्हा गाव गाठले आहे. त्यांना मूळ गावी धान्य मिळण्यास या योजनेमुळे सोयीचे जात आहे.
हेही वाचा: Corona Update: मृत्यूदर वाढला; राज्यात 7 लाख सक्रिय रुग्ण
अशी आहे योजना
- या योजनेतंर्गत एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील ६ हजार ३२० शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची केली उचल
- इतर राज्यातील ३ हजार ५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची केली उचल
- स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी आदींना लाभ
- लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाचा लाभ
- त्यांना मान्य असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध
- लाभार्थ्यांना सध्या असलेल्या शिधापत्रिकांवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करून आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्याचे वितरण
Web Title: One Nation One Ration Card Other State Workers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..