कांदा आणखी रडवणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

बाजारपेठांमधील आवक हळूहळू वाढत असल्याने भाज्यांचे दर कमी झाले. पावसामुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी आहे. पावसामुळे कांद्याचा दर्जाही खालावला आहे. मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला असल्याने बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडाही भासत आहे.

मुंबई - गणेशोत्सवाच्या दरम्यान महाग झालेल्या भाज्यांच्या भावात सध्या ४० ते ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र, कांद्याचा भाव दुप्पट झाला असून, तो आणखी महागण्याची शक्‍यता आहे.

बाजारपेठांमधील आवक हळूहळू वाढत असल्याने भाज्यांचे दर कमी झाले. पावसामुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी आहे. पावसामुळे कांद्याचा दर्जाही खालावला आहे. मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला असल्याने बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडाही भासत आहे.

सध्या बाजारात कांदा ५० रुपये किलोने विकला जात आहे, अशी माहिती भायखळा भाजी मंडईचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली; तर कांद्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्‍यता प्लाझा बाजारपेठेतील विक्रेत्यांनी वर्तविली.

गृहिणींचे जेवण कांद्याशिवाय बनत नाही. भाजी असो वा मांसाहार; प्रत्येकामध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांद्यांचे दर आणखी वाढल्यावर अनेक गृहिणींचे बजेट बिघडणार आहे. कांद्याच्या दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यावसायिक व भाजी-पोळी केंद्रावरही होण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Rate Increase Chance