विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

पुणे : इयत्ता १०वीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरी अद्याप पाॅलिटेक्नीकची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची विद्यार्थी वाट पाहात होते, मात्र त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. कारण आता १० ऑगस्टपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मात्र, अद्याप याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

इयत्ता १०वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थी पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेतात. शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा असते. एकीकडे इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे पाॅलिटेक्नीकचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सध्या केवळ राज्यभरात ३३६ सुविधा केंद्र निश्चित केले असून, त्यापैकी १०२ केंद्र हे पुणे विभागात आहे.

पुणे : कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फसवणूक; बेकायदेशीरपणे फी वसूल​

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे.

अकरावीच्या जागा वाढणार? निकालाच्या वाढलेल्या टक्केवारीचा परिणाम​

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत तंत्रशिक्षण विभागाच्या परिपत्रकाची प्रतिक्षा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online admission process for the polytechnic will start from 10th August 2020