esakal | राज्यातील बावीस जिल्ह्यांत दोन टक्केच लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील बावीस जिल्ह्यांत दोन टक्केच लसीकरण

राज्यातील बावीस जिल्ह्यांत दोन टक्केच लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील ३५ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये एक ते दोन टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. मुंबई आणि पुणे वगळता एकाही जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीचा आकडा दोन अंकांमध्ये नसल्याची माहिती पुढे आली आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्यात लशीचे दोन्ही डोस देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र आणि एक डोस देण्यात उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. ही लस कोणत्या जिल्ह्यातील किती जणांनी लस घेतली, याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. यात एक डोस आणि दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

निष्कर्ष : राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमधील लसीकरणाची टक्केवारी दोन अंकांमध्ये आहे. मुंबईमध्ये १४ आणि पुण्यात ११ टक्के जणांनी लस घेतली. त्या खालोखाल ठाण्यामध्ये लशीची टक्केवारी ८ असून, पाच टक्के नागपूरकरांनी आतापर्यंत लस घेतली आहे. उर्वरित एक आणि दोन टक्के लसीकरण झालेले २५ जिल्हे आहेत. तर, तीन आणि चार टक्के लसीकरणाचे सहा जिल्हे आहेत.

हेही वाचा: नारायण राणेंच्या पत्नी, मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर

दररोज १५ ते २० लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्याची राज्याची क्षमता आहे. त्यासाठी पायाभूत यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रापर्यंत लसीकरण सुरू आहे. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे राज्याला दर महिन्याला तीन कोटी लसीचे डोस मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र सव्वा कोटी लसीचे डोस मिळतात, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या निकषांवर लस वितरण

  • जिल्ह्याची लोकसंख्या

  • लस घेण्यास पात्र नागरिकांची संख्या

  • कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण

  • यापूर्वी पुरवठा केलेल्या लशींचा वापर

पुण्याचे लक्ष्य

पुणे जिल्ह्यात ८७ लाख ४४ हजार नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहेत. त्यापैकी २४ लाख ७७ हजार ६५५ नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर, ६३ लाख ५३ हजार ७१३ जणांना बुधवारी सहापर्यंत पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. पुण्याला किमान एक कोटींहून अधिक लशीच्या डोसची गरज आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील नागरिकांना किमान पहिला डोस मिळावा, यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करता येईल.

- राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

loading image
go to top