esakal | राज्यात मुष्टियोद्धे कसे घडतील? ३६ जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच प्रशिक्षक, तरीही सरकारचं दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

only two trainer for boxing in maharashtra

भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी सुधारावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आखल्या. तालुक्यांपासून महानगरांपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे विणले. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही सकारात्मक परिणाम पाहायला मिळत नाही.

राज्यात मुष्टियोद्धे कसे घडतील? ३६ जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच प्रशिक्षक, तरीही सरकारचं दुर्लक्ष

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : मुष्टियुद्ध हा ऑलिम्पिकमध्ये हमखास पदक मिळवून देणारा खेळ मानला जातो. मात्र, तरीही राज्य सरकार या खेळाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. आजच्या घडीला ३६ जिल्ह्यांमध्ये केवळ दोनच पात्रता असलेले तज्ज्ञ शासकीय प्रशिक्षक आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पदकविजेते मुष्टियोद्धे कसे घडतील? असा गंभीर सवाल मुष्टियोद्धे वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.  

भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी सुधारावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आखल्या. तालुक्यांपासून महानगरांपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे विणले. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही सकारात्मक परिणाम पाहायला मिळत नाही. मुळात राज्यात खेळाडूंना शिकविणारे प्रशिक्षकच कमी आहेत. विभागवार आकडेवारी लक्षात घेतल्यास, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी केवळ चंद्रपूर (विजय ढोबळे) येथेच मुष्टियुद्ध प्रशिक्षक आहे. अमरावती विभागातही कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. विभागातील चार जिल्ह्यांमध्ये फक्त अकोला क्रीडा प्रबोधिनीतच (सतीश भट) एनआयएस प्रशिक्षक आहेत. 

हेही वाचा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

नागपूर जिल्ह्याची स्थिती आणखीणच वाईट आहे. नागपूरचे क्रीडामंत्री, विभागीय क्रीडा संकुलासारखी भव्य वास्तू आणि अल्फिया पठाणसारखी आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू असूनही आजच्या घडीला येथे एकही चांगला, दर्जेदार प्रशिक्षक नाही. तीन महिन्यांपूर्वी एनआयएस प्रशिक्षक अरुण बुटे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. चंद्रपूर आणि अकोला या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील अन्य कोणत्याच जिल्ह्यांमध्ये शासकीय प्रशिक्षक नाही, ही अत्यंत वाईट बाब आहे. 

राज्यातील पायाभूत सुविधांचा विचार केल्यास ३६ पैकी केवळ १६ जिल्ह्यांमध्येच मुष्टियोद्ध्यांना सरावासाठी आवश्यक असलेले 'बॉक्सिंग रिंग' आहेत. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्येच 'बॉक्सिंग रिंग' आहेत. विदर्भात अकोला आणि चंद्रपूर हे दोनच 'अ' श्रेणीचे मुष्टियुद्ध केंद्र आहे, जेथे पुरेसे खेळाडू, प्रशिक्षक आणि 'बॉक्सिंग रिंग' उपलब्ध आहेत. नागपूर, गडचिरोली आणि वर्धा या 'ब' श्रेणीच्या केंद्रातही स्थिती फारशी चांगली नाही. गोंदिया, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांची अवस्था आणखीणच बिकट आहे. येथे प्रशिक्षक व 'बॉक्सिंग रिंग' तर दूर खेळाडूसुद्धा नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुंबईसारख्या राजधानीच्या शहरातही मुष्टियुद्ध केंद्र, 'बॉक्सिंग रिंग' आणि प्रशिक्षक नाहीत. याही परिस्थितीत राज्यातील मुष्टियोद्धे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावून महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून देत आहेत. यामागे केवळ खेळाडूंची मेहनत आणि राज्य संघटनेचे प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत आहेत. यात शासनाचे फारच कमी योगदान आहे. राज्यात खरोखरच खेळाडू घडवायचे असतील तर, प्रत्येक जिल्ह्यात किमान एका प्रशिक्षकाची आवश्यकता आहे. 

हेही वाचा - खर्रा घेतोय नागरिकांचा जीव; थुंकीमुळे पसरतोय कोरोना; शहरात पानठेले  बिनधास्त सुरु    

क्रीडामंत्री लक्ष देणार काय? 
राज्यातील मुष्टियुद्ध खेळाची ही केविलवाणी स्थिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासाठी फार मोठे आव्हान आहे. मूळ नागपूरचे असलेले केदार क्रीडाप्रेमी असून, त्यांना खेळ आणि खेळाडूंच्या भावनांची जाणीव आहे. त्यामुळे यासंदर्भात क्रीडा मंत्र्यांनी ठोस निर्णय घेतल्यास मुष्टियुद्धाला सोन्याचे दिवस येऊ शकतात, असे खेळाडूंचे म्हणणे आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत