कोराईगड भाड्याने देण्यास विरोध

korai-gad
korai-gad

माले - राज्यातील किल्ले खासगी विकसकांना भाडेतत्त्वावर देण्याच्या सरकारच्या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे पंचवीस किल्ले सुरवातीला भाड्याने देण्यात येणार आहेत; त्यात मुळशी तालुक्‍यातील कोराईगड ऊर्फ कोरीगड समाविष्ट असल्याने त्यास ढमाले कुटुंब, गडकिल्लेप्रेमी, विविध संघटनांनी विरोध केला आहे.

मुळशी तालुक्‍यातील पेठशहापूर व आंबवणे या दोन गावांच्या मध्यभागी कोराईगड आहे. किल्ल्यासाठी झालेल्या अनेक लढायांचा उल्लेख उपलब्ध आहे. किल्ल्याची स्थितीही चांगली आहे. किल्ल्यावर लक्ष्मी तोफ, छोट्या तोफा, कोराईदेवीचे मंदिर, विस्तीर्ण पठार, तलाव आहेत. तटबंदी अजूनही शाबूत आहे. पायथ्यापासून पायऱ्यांनी अर्ध्या तासात किल्ल्यावर जाता येते. पर्यटकांची संख्याही मोठी असते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुढाकाराने किल्ल्यावर तोफांना गाडे, प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. परिसरात सहारा कंपनीची अँबी व्हॅली सहारा सिटी आहे. 

युवराज ढमाले, नंदन ढमाले, मंगेश ढमाले, रवींद्र ढमाले, अजिंक्‍य ढमाले, शशिकांत ढमाले, अश्विन ढमाले, बाळासाहेब ढमाले, ओंकार ढमाले, प्रतीक ढमाले तसेच शेरे, वांद्रे, भोरकस, बेलावडे, मुळशी खुर्द, अंबडवेट, सांगवी, कडूस, टाकवे गावांतील व राज्यभर पसरलेल्या ढमाले कुटुंबीयांनी शासनाच्या धोरणाचा विरोध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

या किल्ल्यावर होणारे आक्रमण टाळण्यासाठी सावरगाव येथील लढाईत बाळोजी नाईक ढमाले यांनी प्राणाची आहुती दिली. 

मुळशी तालुक्‍यातील बलकवडे आदी अनेक कुटुंबांचेही योगदान आहे. त्यामुळे कोराईगडाशी आमचे ऐतिहासिक व भावनिक नाते आहे. आमच्या अस्मितेशी सरकारने खेळ करू नये.
- सत्यशील ढमाले, अध्यक्ष, ढमाले देशमुख प्रतिष्ठान 

गड, किल्ल्यांचे संवर्धन शासनाने स्वतःच्या निधीतून करावे. किल्ले भाडेतत्त्वाने देणे जनतेच्या भावनांशी खेळ आहे. किल्ल्यावरील साधा दगडही आमच्यासाठी मौल्यवान आहे.
- नीलेश गावडे, अध्यक्ष, गडकिल्ले सेवा समिती, चिंचवड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com