हे 'बॅड बॉइज'चे सरकार; विरोधकांची टीका 

Radha Krishna Vikhe Patil
Radha Krishna Vikhe Patil

मुंबई : पुलवामा हल्ला, दुष्काळ, अंमलात न आलेले मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांचा निषेध करत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. भाजप-शिवसेना सरकारने आपण "गल्ली बॉय' आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार "बॅड बॉइज' असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

"पुलवामाच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या "सीआरपीएफ' जवानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच सभा, समारंभ, सोहळे आयोजित करणाऱ्या असंवेदनशील भाजप सरकारने आजचा चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होता, परंतु सरकारने पुन्हा एकदा संवेदनशून्यतेचे दर्शन घडविले,'' अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी युतीच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. 

चौकीदार चोर है म्हणणाऱ्या शिवसेनेने यू टर्न घेऊन भाजपशी युती केली. चोर चोर मौसेरे भाई या नात्याने ही युती झाली असल्याचे मुंडे म्हणाले. ज्या अटींवर शिवसेनेने युती केली तो नाणार प्रकल्प रद्द करण्याचा शासन निर्णय कधी निघणार? सरसकट कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांचा सात-बारा कधी कोरा होणार? शिवसेनेने युती करण्यासाठी सांगितलेली कारणे हा चुनावी जुमला असल्याची टीकाही मुंडे व विखे पाटील यांनी केली. 

राज्यात तीव्र दुष्काळ आहे. मात्र जलयुक्त शिवारचे अपयश लपविण्यासाठी टॅंकर पुरविले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षच्या नेत्यांनी केला. मुख्यमंत्री केंद्राकडून मदत मिळवण्यात अपयशी ठरलेत. जनावरांच्या चाऱ्यातही राजकरण केले जातेय. आता शेतकऱ्यांचा पक्ष पाहून जनावरांना चारा देणारा का? शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजारांची मदत द्यावी, अशी मागणी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. 

कर्जमाफी योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले, असे सांगून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात 2015 मध्ये 3 हजार 265 आत्महत्या, 2016 मध्ये 3 हजार 80 आत्महत्या, 2017 मध्ये 2 हजार 917 आत्महत्या, तर 2018 मध्ये 2 हजार 761 शेतकरी आत्महत्या झाल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. 

न्यायालयात जाणार 
अधिवेशन संपल्यावर मुंबईच्या डीपी गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. डीपी प्लॅनबाबत केलेल्या आरोपांवर मी ठाम असून, त्यासाठी न्यायालयीन लढा देणार आहे. मांडवली करायला आणि यू टर्न घ्यायला मी उद्धव ठाकरे नाही, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com