धनगर आरक्षणावरून विरोधक आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

विधान परिषदेत गदारोळ; कामकाज तहकूब
मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर शनिवारी विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या आक्रमक तोफांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

विधान परिषदेत गदारोळ; कामकाज तहकूब
मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर शनिवारी विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या आक्रमक तोफांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रामराव वरकुटे यांच्यासह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज रद्द करून धनगर आरक्षणावर चर्चा करण्यासाठी नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. भाजप सरकार राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी बारामती येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याची आठवण मुंडे आणि कॉंग्रेसचे रामहरी रूपनवार यांनी करून दिली. सरकार सत्तेवर आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा निर्णय घेण्याचे आश्वासन देत फडणवीस यांनी आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर 4 जानेवारी 2015 रोजी नागपूर येथील मेळाव्यात 15 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या 125 बैठका झाल्या असतील, मात्र धनगर समाजाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप मुंडे आणि रूपनवार यांनी केला.
राज्य सरकार धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसत असून, सरकारची "करणी आणि कथनी' भिन्न असल्याचा आरोप रूपनवार यांनी केला. धनंजय मुंडे यांनी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना लक्ष्य केले. "समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी भाबडी आशा समाज बाळगून आहे. मात्र आरक्षण राहिले बाजूला मंत्रिमंडळात मिळालेल्या आरक्षणावर दोघे खूश आहेत,' अशी टीका मुंडे यांनी केली. तुमच्या ठिकाणी मी असतो तर कपाळाला भंडारा लावून मंत्रिमंडळातून बाहेर पडलो असतो, असे ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता, राज्य सरकाचा प्रस्तावच आला नसल्याचे उत्तर केंद्र सरकारने दिल्याची आठवण मुंडे आणि रूपनवार यांनी करून दिली.
सभागृहात उपस्थित असलेले सभागृह नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विरोधक खोटेच रेटून बोलत आहेत, त्यांना आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करायचे आहे. केंद्राला घाईघाईत प्रस्ताव दिल्यास अडचणी होतील म्हणून टाटा सामाजिक संस्थेचा अहवाल आल्यावर ठोस प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल.

पाटील यांच्या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि गोंधळाला सुरवात झाली. यावेळी विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली आणि गदारोळ उडाला. विरोधी पक्षाचे सदस्य सभात्याग करण्याच्या तयारीत असतानाच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज 45 मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा झाले असता याच विषयावर विरोधकांनी सभात्याग केला.

Web Title: opposition party aggressive on dhangar reservation