विरोधी पक्षांच्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट

नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात पळसगाव येथील शेतकरी बंडू करकाडे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यात्रेला सुरुवात केली.

या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, बसवराज पाटील, जयदत्त क्षीरसागर, सुनील केदार, वीरेंद्र जगताप यांच्यासह 50 आमदार सहभागी झाले आहेत. सर्वप्रथम या नेत्यांनी पळसगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आलेख वाढत आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या आमदारांनी केला. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी कर्जमुक्ती यात्रा काढण्यात आल्याचे सांगणात आले. या यात्रेत सर्वपक्षीय आमदार, नेते मात्र वातानुकूलित वाहनात आले होते; तर यात्रेला पाठिंबा देण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी भरदुपारी बैलबंडी घेऊन सहभागी झाले.

शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकोपा, एमआयएम या पक्षांचे आमदार सहभागी झाले आहेत. सिंदेवाही येथील श्रवण लॉन येथे आज दुपारी सभा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूरला दुपारी दोन वाजता यात्रेचे आगमन होईल. घुग्घुस, वणी मार्गाने ही पदयात्रा रात्री यवतमाळ जिल्ह्यात दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यातील शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचा समारोप 4 एप्रिल रोजी पनवेल येथे जाहीर सभेने होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oppositions sangharshyatra start from chandrapur