आमची कर्जमाफी अन् तुमची वन टाईम सेटलमेंट !

विकास गाढवे
शुक्रवार, 29 जून 2018

कर्जमाफी व कर्जवाटपाची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या एक लाख 52 हजार 806 पैकी एक लाख 40 हजार 344 शेतकऱ्यांना 379 कोटी 60 लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.

लातूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. यात दीड लाखाच्या पुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यास दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. दीड लाखाच्या पुढे एक लाख 70 हजार रूपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी एकरकमी तडजोड योजनेतून (वन टाईम सेटलमेंट) कर्जमाफी द्यावी, असा शेतकरी आणि बॅंकांच्या फायद्याचा अनोखा पर्याय राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढे आणला आहे. या पर्यायातून शेतकरी कर्जमुक्त होईल आणि दुसरीकडे बॅंकांचा वाढलेला एनपीएही कमी होईल, असा दावाही रावते यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता. 28) रात्री आयोजित कर्जमाफी व कर्जवाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आपल्या पर्यायाचे समर्थन करताना रावते यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून बड्या कर्जदारांना वन टाईम सेटलमेंटमधून (ओटीएस) देण्यात येणारी कर्जमाफी अधोरेखित केली. ओटीएसमधून राष्ट्रीयीकृत बँकांकडून एनपीए झालेल्या कर्जावरील व्याजात मोठी सूट देऊन मुद्दलाच्या रकमेत तडजोड करण्यात येते. याच धर्तीवर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ द्यावा, असा आग्रह रावते यांनी धरला आहे. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यानंतर दीड लाखाची कर्जमाफी देण्यात येत आहे. 

बॅंकांनी जास्त झळ सोसू नये. दीड ते एक लाख 70 हजार रूपयापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दीड लाख वगळता उर्वरित एक ते वीस हजार रूपयापर्यंतची माफी ओटीएसमधून दिल्यास हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास रावते यांनी यावेळी व्यक्त केला. रावते यांच्या या पर्यायावर बॅंका कितपत पुढाकार घेतील, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. आर्थिक अडचणीमुळे दीड लाखाच्या वरील रक्कम शेतकरी भरू शकत नाहीत. यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे रावते म्हणाले. कर्जमाफीनंतर नवीन कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन तातडीने कर्ज वाटप करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

379 कोटीची कर्जमाफी

कर्जमाफी व कर्जवाटपाची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या एक लाख 52 हजार 806 पैकी एक लाख 40 हजार 344 शेतकऱ्यांना 379 कोटी साठ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित बारा हजार 462 शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतून लाभ देण्याचे प्रयत्न असून उद्दिष्टाच्या 39 टक्के पिक कर्जवाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर रावते यांनी प्रशासनाच्या समन्वयाचे कौतुक करून दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्याचेही स्मरण केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईनटकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बुरुडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक अशोक गटाणी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव उपस्थित होते.

Web Title: Our debt waiver and your one time settlement