आमचं सरकार गतिमान : मुख्यमंत्री

नवनाथ इधाटे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

तालुक्यातील जनतेला एकाच छताखाली मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमुळे विकासाची चक्रे फिरणार आहेत. रस्त्ये, वीज , पाणी आदी सुविधा देऊन आमचे सरकार जनतेच्या हिताचे काम करीत आहे. यापुढेही विकासाच्या कामाला आणखी गती देण्याचे काम भाजप सरकार करणार आहे. 

- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

फुलंब्री : आमचं सरकार हे गतिमान सरकार असून, तालुक्याची प्रशासकीय इमारत तयार झाली. मात्र, आता या इमारतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम हे गतिमान होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

फुलंब्री येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम कार्यालय व फुलंब्री-कान्होरी - बाबरा - नाचनवेल रस्ता आदी विकासकामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता.3) लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी डिजीटल माध्यमातून दहा कार्यालयांची उद्घाटने करण्यात आली. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवणीत कौर, मुख्य अभियंता खंडेराव पाटील, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोनगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी अनुराधा चव्हाण, भाजपचे तालुका समन्वयक अप्पासाहेब काकडे, योगेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, या प्रशासकीय इमारतीतून नागरिकांना आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. जनतेची कामे वेळेवर होण्यासाठी सेवा हक्क अधिनियम आम्ही निर्माण केला. योग्य वेळेत सेवा दिली नाही. तर प्रशासकीय अधिनियमातून अधिकाऱ्यांना दंड केला. त्यातून 98 टक्के लोकांना सेवा वेळेत दिली. सरकार हे जनतेकरीता असते तोच प्रयत्न आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे सरकार आहे. आमच्या सरकारने 50 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ''मागील 15 वर्षांतही एवढी मदत झाली नाही ती आम्ही केवळ चार वर्षांत दिली. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु सर्वच समस्या पूर्ण झाल्या नसल्यातरी 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करून जुलैपर्यंत शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार आहोत. मराठवाड्यातील 2 लाख शेतकऱ्यांना विद्युत पंप दिले. जिल्ह्यात साडेदहा हजार शेततळे शेतकऱ्यांना दिले. 948 गावांमध्ये 339 कोटींची विकासकामे केली. 'प्रधानमंत्री आवास योजने'तून 6 लाख लोकांना घरे दिली. उर्वरित बेघरांना घरे देण्याचे काम सुरू आहे. 30 हजार किलोमीटरचे रस्ते 2019 च्या अखेर पूर्ण करणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 18 हजार गावांच्या योजना पूर्ण केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

मुख्यमंत्री फडणवीस सभेत बोलत असताना सिल्लोड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील सुरेश सनानसे यानी उभे राहून दुष्काळाचं बोला? पीक विम्याच बोला? शेतकऱ्यांच्या मदतीच काय? स्वाभिमानी शेतकरी संघटना झिंदाबाद असा नारा लगावताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सभेबाहेर ढकलत नेले. सभा सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लोगो लावून फिरणाऱ्या चार पाच कार्यकर्त्यांना व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसून ठेवले. 

फुलंब्रीच्या विकासाला गती : रावसाहेब दानवे 

तालुक्यातील जनतेला एकाच छताखाली मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमुळे विकासाची चक्रे फिरणार आहे. रस्त्ये, वीज , पाणी आदी सुविधा देऊन आमचे सरकार जनतेच्या हिताचे काम करीत आहे. यापुढेही विकासाच्या कामाला आणखी गती देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय इमारत शंभर वर्षे टिकणार : हरिभाऊ बागडे

11 कोटी 70 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली प्रशासकीय इमारत सुमारे शंभर वर्षे टिकणार असल्याची शाश्वती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. तसेच फुलंब्री धरणाला आठ कोटी, कर्जमाफीसाठी 20 हजार कोटी, मागच्या वर्षी पीकविम्यासाठी 12 हजार कोटी,  रस्त्यासाठी राज्यकडून 350 कोटी तर केंद्रकडून 300 कोटींचा निधी आणला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दहाच मिनिटात गुंडाळली सभा

फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा दुपारी एक वाजता नियोजित वेळेत पार पडणार होता. परंतु, बारा वाजेपासून या सभेला आवक-जावक सुरू झाली होती. एक वाजता येणारे मुख्यमंत्री साडेतीन वाजता आले. अन् दहा मिनिटं तीस सेंकंद बोलून लोकसभा, विधानसभा  निवडणुकीची रंगीत तालीम करून परतले.

Web Title: Our Government is Progressive says CM Devendra Fadnavis