१५२० बेपत्ता मुली-महिलांपैकी ४१४ सापडल्याच नाहीत! विवाहितांचा ‘हुंड्या’साठी छळ

१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर या काळात सोलापूर ग्रामीणमधील तब्बल ९०४ महिला (१८ वर्षांवरील) बेपत्ता झाल्या असून, त्यातील ३५४ महिला पोलिसांना सापडलेल्या नाहीत. तर १८ वर्षांखालील ३१ मुली बेपत्ताच आहेत. शहरातील ६० मुली-महिलांना शोधण्यात शहर पोलिसांना यश आलेले नाही.
पत्नीचा छळ
पत्नीचा छळsakal media

सोलापूर : आई-वडिलांची लाडकी सुखाच्या संसाराचे स्वप्न उराशी बाळगून सासरी जाते. पण, काही दिवसांतच ‘हुंड्या’साठी पती, सासू-सासऱ्यांकडून तिचा छळ सुरू होतो आणि तिचे स्वप्न उद्ध्वस्त होते. माहेरून पैसे आण, विवाहात मानपान नीट केला नाही, नवीन घर, गाडी घ्यायला पैसे आण म्हणून तिला उपाशीपोटी ठेवले जाते. काही प्रकरणांत पत्नीच्या परस्पर पतीने दुसरा विवाह केल्याचेही दिसून आले. १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर दरम्यान तब्बल एक हजार २० विवाहितांनी सासरच्या अन्यायाविरुद्ध पोलिसांत धाव घेतली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षात अनेकांचे जॉब गेले, व्यवसाय डबघाईला आले. खासगी सावकार आणि बॅंकांच्या कर्जाचे हप्ते थकले. अशावेळी पत्नीच्या माहेरून पैसे आण म्हणून तिला उपाशीपोटी ठेवणे, घालून-पालून बोलणे, चारित्र्यावर संशय घेणे असे प्रकार सुरू झाले. काहीजणांच्या संसारात वाद निर्माण व्हायला मोबाईल आणि ठिकठिकाणी विक्री होणारी अवैध दारू कारणीभूत ठरली आहे. हुंडा हा घेतलाच जातो, पण त्याचा बोभाटा होत नाही. वस्तू आणि दागिन्यांच्या स्वरूपात काहीजण हुंडा घेतात. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दरमहा सरासरी २० ते २५ अर्ज दाखल होत असल्याचे चित्र आहे. तरीही, दिलासादायक बाब म्हणजे एकूण एक हजार ५० तक्रारींपैकी ५५४ तक्रारींवर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने समझोता करून तुटू लागलेले संसार पुन्हा जोडले आहेत. पण, सध्याच्या विज्ञान युगातदेखील पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात असल्याची जाणीव या वाढलेल्या घटनांवरून महिलांना विशेषत: नवविवाहितांना होऊ लागली आहे.

४१४ महिला-मुलींना शोधण्यात पोलिसांना अपयश

मागील काही वर्षांत मुली, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशातच १८ वर्षांवरील महिला व १८ वर्षांखालील मुली पळून गेल्याचे तथा बेपत्ता होण्याचे प्रमाण देखील खूपच वाढले आहे. १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर या काळात सोलापूर ग्रामीणमधील तब्बल ९०४ महिला (१८ वर्षांवरील) बेपत्ता झाल्या असून, त्यातील ३५४ महिला अजूनही पोलिसांना सापडलेल्या नाहीत. तर १८ वर्षांखालील ३१ मुली बेपत्ताच आहेत. शहरातील ६० मुली-महिलांना शोधण्यात शहर पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. त्यात १८ वर्षांखालील १४ मुली तर १८ वर्षांवरील ४६ महिला आहेत.

‘सरपंच भाभी’ बेपत्ताच

कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या ‘सरपंच भाभी’ जैतुनबी शेख या ९ सप्टेंबर रोजी भरदुपारी शेळा राखायला गेल्यावर अचानक बेपत्ता झाल्या. या घटनेला आता अडीच महिने झाले, पण अजूनपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. सुरवातीला वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांकडे तपास होता. आता हा तपास पोलिस हवालदारांकडे सोपविला आहे.

नवविवाहितांच्या तक्रारींचे स्वरूप

  • शहर पोलिस आयुक्तालय

  • एकूण तक्रारी

  • ७४५

  • समझोता

  • ३६८

  • प्रलंबित अर्ज

  • ६८

  • न्यायालय व पोलिसांत गुन्हा

  • १८९

-----

ग्रामीण पोलिस दल

  • एकूण तक्रारी

  • २७५

  • समझोता

  • १८६

  • प्रलंबित अर्ज

  • ०२

  • न्यायालय व पोलिसांत गुन्हा

  • ८७

पत्नीचे केस कापलेला पीडितेचा पती सापडेना

पत्नी सुमैय्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती कलीम चौधरी याने न्हाव्याला घरी बोलावून पत्नीचे केस कापले. भाड्याच्या घरात राहणाऱ्या पतीने तिला स्वत:चे घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण म्हणूनही छळ केला. माहेरील परिस्थिती बिकट असल्याने ती शेवटपर्यंत नकारच देत राहिली. शेवटी त्याने तीनवेळा तलाक म्हणत रिक्षातून जबरदस्तीने माहेरी नेऊन सोडले. या प्रकरणी सुमैय्याने जेलरोड पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नेत्र साक्षीदारांचा जबाब घेतला आणि गुन्ह्याची पुष्टी केली. पण, पोलिसांना अजूनपर्यंत पती, सासू व सासरा हे तिन्ही संशयित आरोपी सापडलेले नाहीत, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com