पंढरीत चार लाख भाविक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जनावरांच्या बाजारात २० लाखांची उलाढाल
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी यात्रेत जनावरांचा बाजार फुलला आहे. सुमारे चार हजारांहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. बाजारात गुरुवारी पहिल्याच दिवशी सुमारे २० लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या वाखरी येथील जनावरांच्या बाजारात खिलार बैल आणि खोंडाला मोठी मागणी असते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून जातिवंत खिलार जातीचे बैल आणि खोंड विक्रीसाठी येतात. आज सकाळपर्यंत बाजारात चार हजाराहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे २० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.

पंढरपूर - कार्तिकी यात्रेसाठी सुमारे चार लाख भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज बारा तास लागत होते. शुक्रवारी (ता. ८) कार्तिकीचा मुख्य सोहळा साजरा होत असून, पहाटे अडीचच्या सुमारास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता आदी भागांत वारकऱ्यांची गर्दी आहे. परंतु, दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या कमी दिसत आहे. शहरातील मठ, धर्मशाळांमधून कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलेले असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करून जीवरक्षक, होडीचालक आणि ‘एसडीआरएफ’च्या जवानांना सूचना दिल्या. नदीच्या तीरावर महिलांना कपडे बदलण्यासाठी मंदिर समितीकडून दरवर्षी यात्रेदरम्यान तात्पुरत्या खोल्या उभारण्यात येतात. यंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने खोल्या उभारण्यास जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Kartik yatra