पंढरपूर - नुकत्याच झालेल्या माघी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस देणगी आणि अन्य माध्यमातून एक कोटी 58 लाख 57 हजार 891 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. दुष्काळी परिस्थिती असतानादेखील गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पन्नात 48 लाख 19 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
श्री विठ्ठलाच्या चरणांजवळ 16 लाख 55 हजार 599 रुपये, श्री रुक्मिणीमातेच्या चरणांजवळ चार लाख 49 हजार 12 रुपये, अन्नछत्र देणगी दोन लाख पाच हजार 621 रुपये, पावती स्वरूपातील देणगी 45 लाख 24 हजार 266 रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री 25 लाख 62 हजार, राजगिरा लाडू विक्री तीन लाख 53 हजार, फोटो विक्री 51 हजार 550 रुपये, सर्व भक्त निवास भाडे सहा लाख 45 हजार 425 रुपये, नित्यपूजा दोन लाख 86 हजार, हुंडी पेटी जमा 31 लाख 58 हजार 718 रुपये, ऑनलाइन देणगी एक लाख 77 हजार 528 रुपये, अन्य स्वरूपात देणगी 18 लाख तीन हजार 423 रुपयांचा समावेश होतो. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एक कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये इतके उत्पन्न मंदिर समितीस प्राप्त झाले होते.
माघी यात्रेत माघ शुद्ध 1 ते माघ शुद्ध 15 या कालावधीत सुमारे तीन लाख नऊ हजार 815 भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श, तर सुमारे एक लाख 71 हजार 599 पेक्षा जास्त भाविकांनी मुखदर्शन घेतले.
|