पंढरपूरसाठी अल्प व्याजाने दीर्घ मुदतीचे कर्ज - जॉर्डन रिव्हज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पंढरपूर - 'अर्बन डेव्हलपमेंटसंदर्भात कॅनडा आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या कराराअंतर्गत पंढरपूरच्या विकासासाठी दीर्घ मुदतीने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. नेमका किती निधी दिला जाणार, किती वर्षांत प्रस्तावित कामे पूर्ण होणार हे सांगता येणार नाही; मात्र कामांचा आराखडा अंतिम झाल्यानंतर टप्प्याटप्प्यात कामे निश्‍चितपणे पूर्ण होतील,'' असा विश्‍वास कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी मंगळवारी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार भारत भालके, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले उपस्थित होते. जॉर्डन म्हणाले, ""कॅनडामधील प्रगत तंत्रज्ञानाचा पंढरपूरच्या विकासासाठी उपयोग व्हावा, असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मी येथे आलो. कॅनडामधील शहरे अतिशय उत्तमरीत्या वसवण्यात आलेली आहेत. तथापि, भारतातील आणि कॅनडामधील समस्या वेगवेगळ्या आहेत. येथील प्रश्‍न विचारात घेऊन आवश्‍यक कामांसाठी निधी देण्यात येईल.

Web Title: pandharpur maharashtra news loan for pandharpur development