चैत्री यात्रेसाठी पंढरीत दोन लाख भाविक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पंढरपूर - चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरीत सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, पासष्ट एकर परिसर आणि वाळवंट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज पाच तास लागत होते. उद्या (ता. 27) एकादशी असून, श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे.

चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांमुळे शहरातील गर्दी वाढली आहे. शहरातील लॉजेस, मठ, धर्मशाळा आणि नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे. सोलापूरसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी अद्याप चंद्रभागेत पोचले नसल्याने नदीत सध्या पाणी कमी आहे, तरीदेखील आहे त्या पाण्यातच स्नान करून भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनरांगेकडे जात होते. दर्शनाची रांग आज विप्रदत्त घाटाच्या पुढे गेली होती.

"सकाळी सहाच्या सुमारास दर्शनरांगेत उभा होतो. पाच तासांनी दर्शन झाले. दर्शनरांगेत व दर्शन मंडपामध्ये श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर समितीने पाणी, पंखे यांसह चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.'
- बालाजी हिरामण ऐटवाडे (रा. दिग्रज, ता. उदगीर, जि. लातूर)

Web Title: pandharpur news chaitri yatra bhavik