टोकन पद्धत करणार कार्तिकीपर्यंत कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

उपजिल्हा रुग्णालय चालवण्याचा देणार प्रस्ताव - विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मंजुरी

उपजिल्हा रुग्णालय चालवण्याचा देणार प्रस्ताव - विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मंजुरी
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेसाठी तिरूपती व तुळजापूरच्या धर्तीवर टोकन पद्धत कार्तिकी यात्रेपर्यंत कार्यान्वित करणे, शासनाचे उपजिल्हा रुग्णालय चालवण्यास घेण्याचा प्रस्ताव देणे, दर्शनाच्या उड्डाण पुलासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ते काम वेगाने पूर्ण करून घेणे आदी महत्त्वपूर्ण विषयांना श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. डॉ. भोसले म्हणाले, 'श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌ तास रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी तिरुपतीप्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी तयार केला आहे. केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून ही पद्धत सुरू केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. भाविकांकडून देखील त्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. टोकन पद्धतीचे सादरीकरण केंद्र शासनाने नेमलेल्या त्रिलोक सिक्‍युरिटीज सिस्टिम प्रा. लि. यांच्या अधिकाऱ्यांनी आज समितीच्या बैठकीत केले.

टोकन पद्धतीमुळे उलाढाल वाढणार
विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्राकाळात 25 ते 30 तास आणि एरवी दोन ते चार तास रांगेत थांबावे लागते. टोकन पद्धत सुरू झाल्यानंतर टोकनवर नमूद केलेल्या वेळी भाविकांना मंदिरात जाऊन झटपट दर्शन घेता येईल. भाविक रांगेत तिष्ठत बसण्याऐवजी बाजारपेठेत खरेदी, विविध मठ व मंदिरांना भेटी देतील. त्याचा फायदा बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: pandharpur news token process in pandharpur vittal dhrshan