श्री विठ्ठलाचे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव रद्द

shri vitthal rukmini
shri vitthal rukmini

पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची बैठक आज (गुरुवार) डॉक्टर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना बैठकीतील निर्णय यांच्याविषयी माहिती दिली.

मंदिर समितीकडून भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. दुसरीकडे दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असून, देणगीचे प्रमाण देखील वाढले आहे. मंदिर समितीचे वार्षिक उत्पन्न यंदा 31 कोटी पेक्षा अधिक झाले आहे. सुसज्ज भक्तनिवास कार्यान्वित झाले असल्याने त्या माध्यमातून उत्पन्नात मोठी भर पडत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी सशुल्क दर्शन व्यवस्था करण्याची गरज राहिलेली नाही. सध्या दर्शन मंडपापासून सारडा भवन पर्यंत रांगेसाठी पूल आहे. त्यापुढे पत्राशेड पर्यंत हा पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून, पत्रा शेडच्या ठिकाणी तिरुपतीच्या धर्तीवर भव्य दर्शन मंडप बांधण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे झाल्यावर तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शन व्यवस्था केली जाणार आहे.

यंदा आषाढी यात्रेत गाभाऱ्यातील थेट चित्रीकरण दाखवण्यासाठी शहरात सुमारे वीस ठिकाणी मोठे पडदे (स्क्रीन) लावण्यात येणार आहेत. दोन लाख लिटर पेक्षा जास्त मिनरल वॉटर भाविकांना वाटले जाणार आहे. नवमी ते द्वादशी या दरम्यान रांगेतील भाविकांना मोफत खिचडी तसेच नाष्टा वाटप केले जाणार आहे. मंदिर समितीच्या मदतीसाठी सुमारे १८०० स्वयंसेवक राज्यभरातून येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर संतपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाची मान्यता मिळाल्यावर संतपीठ उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे. मागील वर्षी प्रमाणे हरित वारी उपक्रम राबवला जाणार असून उत्तम काम करणाऱ्या दिंड्यांना गौरव मध्ये जाणार आहे. आजच्या बैठकीस उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचे निर्णय...
भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचे निर्णय मंदिर समितीने घेतली. या सर्व निर्णयांची मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील श्री. ढोले यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मंदिराच्या उत्पन्नवाढीसाठी श्री. ढोले यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे डॉ. भोसले यांनी नमूद केले

यात्राकाळात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. परंतु, सध्याच्या मंदिरातील रांगेच्या व्यवस्थेमुळे दर्शन घेण्यासाठी जास्ती संख्येने भाविकांना मंदिरात जाता येत नाही. त्यामुळे भाविकांना नामदेव पायरी आणि मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन जावे लागते. जास्तीत जास्त भाविकांना मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, यासाठी काशीच्या धरतीवर मूळ मंदिराच्या गाभ्याला धक्का न लावता मंदिराचे भव्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य आमदार राम कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, 'लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री विठ्ठल मंदिर भव्यदिव्य असावे यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर तो भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यावर सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने भव्यदिव्य मंदिराची उभारणी करण्याची कल्पना आहे. या कामासाठी 500 कोटी रुपये लागो अथवा 1000 कोटी रुपये लागतात केंद्र व राज्य सरकार तसेच देणगीदार अशा विविध माध्यमातून निधी उभा केला जाईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com