पोलिओमुक्तीच्या मोहिमेला लकवा

पोलिओमुक्तीच्या मोहिमेला लकवा

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनविण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. "अरिहंत केमिस्ट' या औषध दुकानामधून किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमूने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उत्पादक कंपनीनेच अवैध विक्रीची तक्रार दिल्याने पोलिओमुक्तीच्या मोहिमेला लकवा झाल्याचे समोर आले आहे. 

हैदराबाद येथील "शांथा बायोटेक्‍निक्‍स' ही कंपनी पोलिओ लसींचे उत्पादन करते. केंद्र सरकार त्या सर्व लसींची खरेदी करते. या कंपनीने बाजारात त्यांचे व्हायल्स विक्री होत असल्याची तक्रार केली. दरम्यान, शहरात एकवीसशे रुपयांना पोलिओ इंजेक्‍शनद्वारे देण्यात येणाऱ्या पोलिओ व्हायल्स विक्री होत असल्याची माहिती औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, सहआयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी "अरिहंत केमिस्ट' येथून लेबल बदललेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमुने घेतले. याप्रकरणी अहमदाबादची पुरवठादार कंपनी व राहुरी येथील पुरवठादार, नाशिक आणि औरंगाबाद येथील औषध विक्रेते अशा सहा संशयितांवर नाशिकला गुन्हा नोंदविण्यात आला. सापडलेल्या लसीचे व्हायल बनावट असल्याचा अहवाल हैदराबादच्या उत्पादक कंपनीने दिल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे. 

नमुने हिमाचल प्रदेशात तपासणीला 

अवैध विक्री होत असलेल्या 100 लसींच्या व्हायलचे नमुने हिमाचल प्रदेशातील कसोली येथील प्रयोगशाळेत विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आल्याचे औषध निरीक्षक बजाज यांनी "सकाळ'ला सांगितले. तर या पोलिओ व्हायल्सचे लेबल काढून 2100 रुपये किंमतीचे लेबल लावण्यात आले होते, असे औषध प्रशासनाचे आयुक्त संजय काळे म्हणाले. 

व्हायरसयुक्त लसी 

तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओच्या लसींचा पुरवठा करणाऱ्या दोनपैकी एक असलेल्या बायोमेड कंपनीच्या लसींत टाईप-2 पोलिओ व्हायरस आढळला. या व्हायरसयुक्त लसी उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात वापरण्यात आल्याची शक्‍यता असल्याने दोन्ही राज्यांत अति दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे समोर आले आहे.

टाईप-2 व्हायरसप्रकरणी गुन्हा दाखल होऊन बायोमेड कंपनीच्या संचालकांना अटक झाली. यावर केंद्र सरकारने या लसींचा महाराष्ट्रात पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात औषध प्रशासनाची तपासणी मोहीम सध्या सुरू आहे. तर दुसऱ्या कंपनीच्या नावाने लसी खुल्या बाजारात विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. 

धोका, भीती अन्‌ तस्करी 

लसीकरण मोहिमेमुळे बालके दगावण्याच्या घटना राज्यभर घडल्या आहेत. यातील चौकशीमधील सत्य अद्याप समोर आले नाही. त्यातून लसीकरणाबद्दल भीती निर्माण होत आहे. लसीमधून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याऐवजी या लसींच्या उत्पादनातील गैरप्रकार, तस्करी, चढ्या भावाने विक्री वाढत आहे. हे थांबवून गैरसमज दूर करण्याचे आव्हान औषध प्रशासन व आरोग्य विभागासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com