esakal | अनिल देशमुख बेपत्ता होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे का ? - प्रसाद लाड | Prasad Lad
sakal

बोलून बातमी शोधा

prasad lad

अनिल देशमुख बेपत्ता होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे का ? - प्रसाद लाड

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : परमबीर सिंह (Parambir singh) बेपत्ता होण्यास केंद्रातील भाजप सरकार (bjp Government) जबाबदार आहे, असा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या (mva Government) विद्वानांनी, हेच तर्क वापरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे का याचे उत्तर द्यावे, असा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड (prasad lad) यांनी लगावला आहे.

हेही वाचा: भीमा कोरेगाव हिंसेतील 'त्या' १५ अटक विचारवंताना जामीन दया

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह आता बेपत्ता आहेत. याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत. तर दुसरीकडे देशमुखही इडीसमोर हजर होत नाहीत. त्यामुळे माजी गृहमंत्री व माजी पोलिस आयुक्त बेपत्ता असल्याची विचित्र परिस्थिती सध्या उद्भवली असल्याची खिल्ली उडवली जात आहे. परमवीरसिंह बेपत्ता होण्यास केंद्र सरकारने मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्याला लाड यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे.

देशमुख यांच्या कथित वसुलीप्रकरणाचा तपास सीबीआय व ईडी करीत आहे. त्यांची कारस्थाने आणि वसुलीचे कारनामे न्यायालयासमोर तसेच तपासयंत्रणांसमोर येऊ नयेत म्हणून महाविकास आघाडीच्या धुरणींनीच त्यांना गायब होण्यास सांगितले असावे अशी शक्यता आहे. ते मंत्रीपदावर असताना असे गायब होऊच शकले नसते. म्हणून आधी त्यांचा राजिनामा घेऊन नंतर महाविकास आघाडीच्या चाणक्यांनी त्यांना गायब होण्यास सांगितले असावे. आधी हिंदुत्वाचा व निधर्मीवादाचा जयघोष करणारे व नंतर एकमेकांशी अनैसर्गिक युती करणारे नेतेच अशी कारस्थाने करू शकतात, असेही लाड यांनी सुनावले आहे.

हेही वाचा: खालापूरात पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक

आतापर्यंत शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप कोणाही गृहमंत्र्यांवर व तोदेखील माजी पोलिस आयुक्तांमार्फत झाला नव्हता. पण तो विक्रमही महाविकास आघाडी सरकारने करून दाखवला आहे. देशमुख यांचा पर्दाफाश करणाऱ्या परमवीरसिंह यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्याची स्पर्धाच आता सुरु झाली आहे. यामागे कोण आहे, तसेच आता एकाएकी कंठ फुटलेले हे अधिकारी इतकी वर्षे गप्प का होते, याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच यापूर्वी काँग्रेस सरकारांनीच नेमलेले अन्य सर्व पोलिस अधिकारीही निर्दोष व अत्यंत स्वच्छ आहेत असा सर्वांचा समज आहे.

मात्र त्यांनीही भविष्यात कधीतरी परमवीरसिंह यांच्याप्रमाणे सत्यकथन केल्यावर त्यांच्यावरही अशीच खऱ्याखोट्या आरोपांची मालिका सुरु होईल का, हे देखील पटोले व सावंत यांनी सांगावे. परमवीरसिंह व देशमुख हे दोघे मुंबईतून व महाराष्ट्रातून गृहमंत्री वळसे पाटलांच्या नाकाखालून गायब झाले हे राज्य सरकारचे धडधडीत अपयश आहे. ते अपयश केंद्रावर ढकलण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेस राबवीत आहे, अशीही खिल्ली लाड यांनी उडवली आहे.

loading image
go to top