मुलीच्या प्रसूतीसाठी आई-बापाचा रुग्णवाहिकेला 'दे धक्का' !

हर्षल गांगुर्डे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

''तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेतली असता सदर रुग्णवाहिका खरोखर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. तसा प्रस्ताव देखील जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे''.

-  डॉक्टर पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

गणूर : सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ग्रामीण वैद्यकीय सेवेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चांदवड तालुक्यातील तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मुलीच्या प्रसूतीसाठी आई-बापाला रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली. तरीही रग्णवाहिका सुरु न  झाल्याने शेवटी मालवाहतूक गाडीने महिलेला प्रसूतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची आले.

सोनाली नवनाथ नन्नावरे (वय २२) यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने (दि.२८) रोजी रात्री अकराच्या सुमारास तळेगावरोही प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय सहाय्यक थेटे यांनी तिला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले. नैसर्गिकरित्या प्रसूती होईल, अशी परिस्थिती असताना पहाटे चार वाजता प्रसूती वेदना जास्त होऊ लागल्याने महिलेस चांदवड उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्याचा सल्ला आरोग्य सहायक थेटे यांनी दिला. यासाठी येथील रुग्णवाहिका जेव्हा सुरु करण्याची वेळ आली. तेव्हा सोनालीच्या आई-वडिलांनाच रुग्णवाहिकेला धक्का मारण्याची वेळ आली. एकीकडे मुलीला होणाऱ्या असह्य प्रसूती वेदना अन् दुसरीकडे आई-बापाला रुग्णवाहिका सुरु करण्यासाठीची धडपड अर्धा तास होऊन अयशस्वी ठरल्याने अखेर नातेवाईकांच्या मदतीने मालवाहतूक वाहनाने सोनालीला चांदवड येथे दाखल करण्यात आले. तेथे लागलीच तिची प्रसूती झाली. अन् सोनालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

मात्र या सर्व काळात केवळ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने सोनालीला  सुमारे तासभर मरणयातना भोगाव्या लागल्या, हे सर्व टाळण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क करणे गरजेचे असताना तसे न घडता मालवाहतूक गाडीत महिलेला प्रसूतीसाठी चांदवड येथे दाखल करण्याची वेळ येणं म्हणजे ग्रामीण वैद्यकीय सेवेच्या अकार्यक्षमतेचा कळसच म्हणावा लागेल.

दरम्यान, आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने तळेगावरोही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी बनकर यांच्याशी संपर्क साधला असता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगत एकप्रकारे सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला.  

अश्रू ढाळत आई-बाप लोटत होते. रुग्णवाहिका भल्या पहाटे रक्त गोठवणाऱ्या थंडीत मुलीला होणाऱ्या जीवघेण्या वेदना आई-बापाच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या होत्या, अशा परिस्थितीत रुग्णवाहिका लोटण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने डोळ्यातील अश्रू ते थांबवू शकले नाहीत. ही सर्व लाजिरवाणा प्रकार टाळता आला असता. मात्र, तळेगावरोही प्राथमिक उपकेंद्राचा अकार्यक्षमताच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

Web Title: \Parents had to push an ambulance to save their pregnant daughters life