११ वीसाठी निवडा आवडीचं महाविद्यालय; बुधवारपासून सुरू होणार दुसरा टप्पा!

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 11 August 2020

यंदा 304 महाविद्यालयांमध्ये 1 लाख 6 हजार 972 प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी आत्तापर्यंत 91 हजार 763 जणांनी नोंदणी केली असून, 64 हजार 423 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

पुणे : इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेताना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळावे असे विद्यार्थ्यांची, पालकांची अपेक्षा असतेच. त्यासाठी त्यांची उत्सुकताही ताणली गेलेली आहे. अखेर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये
11वी प्रवेश निश्‍चित करण्यासाठी भाग दोन अर्ज भरणे म्हणजेच पसंती क्रमांक नोंदविण्यासाठी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने जाहीर केले आहे. यामध्ये 12 ऑगस्ट (बुधवार) ते 22 ऑगस्ट या कालावधीत भाग दोन अर्ज भरता येईल. तर पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया 23 ऑगस्टपासून जाहीर होणार आहे.

पिंपरीत रुग्णांची संख्या साडे नऊशेच्या घरात; मृतांची संख्याही घटली​

11वी प्रवेशासाठी भाग एक अर्ज भरण्यास 1 ऑगस्टपासून सुरूवात झाली असून. यंदा 304 महाविद्यालयांमध्ये 1 लाख 6 हजार 972 प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी आत्तापर्यंत 91 हजार 763 जणांनी नोंदणी केली असून, 64 हजार 423 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांना आता भाग दोनचा अर्ज भरावा लागणार आहे. याची मुदत 12 ऑगस्ट रोजी पहाटे 5 पासून 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप भाग एक अर्ज भरलेला नाही, त्यांनाही या कालाधीत भाग एक आणि दोन अर्ज भरता येईल. तसेच विद्यार्थ्यांचे अर्ज तपासणी व मार्गदर्शन केंद्र सुरू राहणार आहेत.

'आयटीआय'चा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ; आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी!

संभाव्य यादीवर हरकती सूचना

पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या यादीवर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येतील. त्यानंतर हरकती आणि सूचनांचे संकलन करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडून कार्यवाही केली जाईल.

30 ऑगस्टला पहिली फेरी होणार जाहीर
विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्यानंतर 30 ऑगस्टला दुपारी 3 वाजता पहिली प्रवेश फेरी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीचे कटऑफ संकेत स्थळावर दिसणार आहे. तसेच विद्यार्थ्याची निवड झालेल्या संबंधित महाविद्यालयाचे नाव दिसेल, त्याचा मेसेजही नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल. महाविद्यालयास विद्यार्थ्यांची यादी दिसेल.

31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्याला पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले असेल तर त्यावर प्रवेश निश्‍चीत करावा, घेतलेला प्रवेश रद्दही करता येईल. तसेच प्रवेश घ्यायचा नसल्यास कोणतीही कार्यवाही करू नये. तसेच व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यानुसार प्रवेश सुरू रहातील. 3 सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीत झालेले प्रवेश ऑनलाईन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ.

अंतिम वर्ष परीक्षेवर 'या' दिवशी होणार सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख​

हे लक्षात ठेवा
- विद्यार्थ्याने अर्जात निवडलेल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालयाचे नाव पहिल्याच फेरीत असेल तर प्रवेश घेणे बंधनकार असेल.
- संधी मिळूनही प्रवेश घेतला नाही तर पुढील फेरीमध्ये त्यांना संधी मिळणार नाही.
- प्रवेश रद्द केला असेल किंवा घेतला नसेल तर विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
- प्रवेश रद्द करायचा असेल तर संबंधित उच्च महाविद्यालयाला विनंती करून प्रवेश रद्द करावा.

महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे
भाग दोन अर्ज भरण्याची मुदत - 12 ते 22 ऑगस्ट
हरकती, सूचना नोंदविण्याची मुदत - 23 ते 25 ऑगस्ट
पहिली फेरी जाहीर - 30 ऑगस्ट
फेरीत निवड झालेल्यांनी प्रवेश निश्‍चीत करणे - 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part II application can be filled from 12 to 22nd August to ensure 11th admission