पार्थ यांच्या विधानसभा उमेदवारीवर अजित पवार यांनी दिले उत्तर, म्हणाले...

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 26 जुलै 2019

काहींची चौकशी सुरु आहे, काहींना कारखान्यासाठी कर्ज हवे आहे. तर काहींच्या पतसंस्थावर गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे अनेकजण भाजप-सेनेत गेले आहेत. आपले वय वाढलेय, लोकसभेचा निकाल काय लागला हे पाहून पक्षांतर करत आहेत.

- अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पार्थ पवार उभारणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले. 

येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांना एका बड्या नेत्याने ऑफर दिली होती. पण ते गेले नाहीत. 1985 ला राजीव गांधींना 3/4 बहुमत मिळाले होते. मात्र, 1989 ला व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. सरकारमधील काही मंत्र्यांचे पंख छाटले गेले. आता आगामी विधानसभेसाठी आम्ही काहीही करुन 175 जागा निवडून आणायच्याच आहेत, यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. 
आमचा 30 वर्षांचा अनुभव पणाला लावून आम्ही विधानसभा लढवणार आहे, असा निर्धार अजित पवार यांनी केला.

सध्या विविध पक्षांतील नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, काहींची चौकशी सुरु आहे, काहींना कारखान्यासाठी कर्ज हवे आहे. तर काहींच्या पतसंस्थावर गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे अनेकजण भाजप-सेनेत गेले आहेत. आपले वय वाढलेय, लोकसभेचा निकाल काय लागला हे पाहून पक्षांतर करत आहेत.

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- पीक विम्याबाबत मोर्चे कसले काढताय? 

- कर्जमाफी केली तर आम्ही कौतुक करु. 

- कर्जमाफी हे नवे गाजर दाखवलेय. निवडणुका जिंकण्यासाठी या घोषणा सुरु आहेत.

- अनेक लोक पक्षांतर करत आहेत आमच्याही पक्षाचे काही लोक गेले. 

- कोणीही गेले तरी पक्ष चालत राहतो, काही प्रमाणात फटका बसतो मात्र ती जागा भरुन काढली जाते. 

- प्रलोभन दाखवून माणसे फोडण्याचे काम सुरुय. 

- राज्यात आणि देशतही हा प्रकार सुरुय. 

- आमच्या सरकारमध्ये फार वाद झाले नाहीत. 

- मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे म्हणून लोकांनी निवडून दिलेय. 

- मोदींच्या नावामुळे भाजपला अनेक ठिकाणी सत्ता मिळवता आली.

- मोदींचा करिश्मा आहे ते मान्य करावे लागेल. 

- पुलवामा आणि बालाकोट घटनेमुळे देशात सुप्त लाट पाहायला मिळाली. 

- सोलापूरच्या खासदारांचा राजकारणाशी काही संबंध आहे का? ते भाजपच्या किती नगरसेवकांना ओळखतात? 

- खासदारांनी पहिल्यांदाच मतदान केले. यापूर्वी ते मठात बसत होते. 

- एफआरपी वाढवली नाही. 

- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातायत. 

- सरकारच्या उदासीन धोरणामुळे रुपाली पवारची आत्महत्या

- मी या सरकारचा धिक्कार करतो. 

- इतर घटकातील मुलांप्रमाणे खुल्या गटातील मुलांना शिक्षणासाठी सवलती मिळायला हवी. 

- शैक्षणिक कर्जासाठी स्टेट बॅंकेच्या मॅनेजरने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे रुपालीला आत्महत्या करावी लागली. 

- आमचे सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के जागा राखीव ठेवणार. 

- सत्तेत आल्यानंतर याबाबतचा कायदा करणार. 

- आज अनेक नेते पक्ष सोडून गेलेत आणखीही जातील. मात्र, आम्ही तमा बाळगत नाही. 

- ताज्या दमाच्या नेत्यांना तिकिट दिले जातील. 

- कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होणार. 

- वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. 

- वंचितमुळे बारा जागावर फटका बसला. दोघांनाही फटका बसला. 

- विरोधकांनी समंजसपणा दाखवणे गरजेचे आहे. 

- वेळ पडली तर जागा मागे पुढे करण्यास तयार.

- स्वाभिमानी, बहुजन विकास आघाडी, आरपीआयचे पक्ष, यांच्यासोबत चर्चा सुरुय. 

- ३० जुलैपर्यंत मुलाखती पूर्ण करणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Pawar will not Contest Assembly Election says Ajit Pawar