पराभूत उमेदवारांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहिल - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

चांगले प्रयत्न करुन आपण विधानसभा लढवली. एक्झिट पोल आले त्यावेळी राष्ट्रवादी 20 ते 25 जागीसुद्धा निवडून येणार नाहीत असे सांगितले गेले. परंतु, 63 ते 64 जागा येतील अशी मला खात्री होती असेही जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : आपण राज्यात चांगली लढत दिली आहे. काही ठिकाणी खूप कमी फरकाने पराभूत झालो आहोत. त्यातून खचून न जाता नव्या दमाने उभे रहा पक्ष तुमच्या पाठीशी ठाम उभा राहिल असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना दिले आहेत.

चांगले प्रयत्न करुन आपण विधानसभा लढवली. एक्झिट पोल आले त्यावेळी राष्ट्रवादी 20 ते 25 जागीसुद्धा निवडून येणार नाहीत असे सांगितले गेले. परंतु, 63 ते 64 जागा येतील अशी मला खात्री होती असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेब, महाराष्ट्रात फिरले आणि राज्यातील वातावरण फिरले. आम्ही अनेक नवीन चेहरे दिले ते येतील असा कयास होता परंतु काही पराभव जिव्हारी लागले आहेत. काही फरकाने हे पराभव झाले आहेत. बुथ कमिट्यांनी लक्ष ठेवण्याचे काम केले. बुथ कमिट्यांचे सैन्य कमी पडले तिथे पराभव झाला असेही जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पराभव झालेल्या उमेदवारांनी आपले विचार मांडले. यामध्ये शशिकांत शिंदे, राजीव देशमुख, दिपिका चव्हाण, बबलु चौधरी, दत्तात्रय बोरुडे, उत्तमराव जानकर, संजय कदम, धनंजय पिसाळ, ज्योती कलानी, प्रभाकर देशमुख, प्रकाश तरे, सचिन दोडके, घनश्याम शेलार यांचा समावेश आहे.

विधानसभेत काही फरकाने व दुसऱ्या क्रमांकावर पराभव झालेल्या राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पराभवाची कारणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: party stay behind the defeated candidates in Election says Jayant Patil