सलाम! हुतात्मा मेजर राणेंच्या स्वप्नपूर्तीसाठी पत्नी अव्वल गुणांसह सैन्यदलात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंतच कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

ठाणे - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. विशेष, म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंतच कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

कौस्तुभ राणे यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना मेजर राणे यांनी देशासाठी बलिदान दिले. तर, राणे कुटुंबीयांचा अभिमानही अवघा देश बाळगत होता. आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कनिका राणे यांनी वर्षभरातच सैन्यदलात भरती होण्यासाठी हवी असणारी सर्व पूर्वतयारी त्यांनी केली असून परीक्षाही दिल्या आहेत. सैन्यात भरती होण्यासाठी कनिका राणे यांनी दिलेल्या परीक्षेत त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्णही झाल्याची माहिती आहे. याशिवाय लवकरच पुढील ट्रेनिंगसाठी चेन्नईला जाणार आहेत. एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या वीरमरणानंतर स्वतःला सावरणं, त्यातही पुन्हा स्वतः सैन्यात जाण्याचा निर्णय घेणं, त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं, त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं आणि भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांचे निर्णय अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत. तसेच, आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत देशसेवा करुन देशाला आदर्शपत्नीची प्रेरणा देणारे आहेत. 

कौस्तुभला देशासाठी अजुन खुप काही करायचे होते. त्याचे स्वप्न लष्करात जाऊन मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं कनिका राणे यांनी सांगितले आहे. आपलं लहान मुल आणि पत्नी मागे असताना देखील कौस्तुभने आधी देशाचा विचार केला. आपल्या वडिलांनी देशासाठी सैन्यात दाखल होऊन जे केले ते लहानगा अगस्त्य पाहु शकला नाही. पण आपली आई देशासाठी सैन्यात दाखल होऊन काय करतेय हे तो प्रत्यक्ष पाहिल तेव्हा त्याला सैनिक काय हे कळेल असं कनिका म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pass the exam with top marks in the military to fulfill the dream of the martyr's husband kaustubh rane