रात्रीच्यावेळी झाला ६ बिबट्यांचा हल्ला; केला थेट वनमंत्री राठोड यांना फोन आणि सुस्त यंत्रणेला आली जाग

टीम ई सकाळ   
Sunday, 10 January 2021

वरच्या बाजूने असलेल्या फटीतून सहा बिबट्यांनी आत प्रवेश केला. जनावरांच्या ओरडण्याने वाघमारे कुटुंबीय बाहेर आले तेव्हा बिबट्यांनी हल्ला केल्याचे दिसले. सहा बिबटे दिसल्याने भीतीने त्यांची गाळण उडाली.

संगमनेर  : दाढ खुर्द येथील एका वस्तीवर एक-दोन नव्हे, तर सहा बिबट्यांनी एकदाच हल्ला केला. शेळ्यांचा फडशा पाडला. त्याच वेळी कार्यकर्त्यांनी वनअधिकाऱ्यांना फोन केले, परंतु ते उचलले नाहीत. अखेर वनमंत्री संजय राठोड यांना रात्री 12 वाजता फोन केला. त्यांनी तक्रार ऐकून घेऊन लगेचच वनअधिकाऱ्यांना आदेश दिले. यांनतर सुस्त यंत्रणा खाड्कन जागी झाली. 

दाढ खुर्द शिवारामध्ये शेतकरी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर, घराजवळ शेळ्यांसाठी तारेची भक्कम जाळी असलेला बंदिस्त गोठा बांधलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूने असलेल्या फटीतून सहा बिबट्यांनी आत प्रवेश केला. जनावरांच्या ओरडण्याने वाघमारे कुटुंबीय बाहेर आले तेव्हा बिबट्यांनी हल्ला केल्याचे दिसले. सहा बिबटे दिसल्याने भीतीने त्यांची गाळण उडाली. दोन बिबटे घराच्या गेटजवळ, दोन मागील बाजूला, तर आंब्याच्या झाडाचा आधार घेत दोघांनी गोठ्यात प्रवेश केल्याचे त्यांना दिसले. एक शेळी ठार करून त्यांनी बाहेर ओढून नेली होती. 

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

पावसामुळे वाड्या- वस्त्यांवरील शेतकरी घरांत झोपले होते. भक्ष्याच्या शोधात निघालेल्या सहा बिबट्यांनी या सोईच्या वातावरणात डाव साधला. आंब्याच्या झाडावरून बंदिस्त गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्या ठार केल्या. जनावरांच्या ओरडण्यामुळे, काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या कुटुंबातील एका महिलेवरही बिबट्याने चाल केली. मात्र, सुदैवाने ती बचावली. हा थरार घडला संगमनेर तालुक्‍याच्या पूर्व भागातील दाढ खुर्द येथील वाघमारे वस्तीवर शुक्रवारी (ता. 8) रात्री साडेअकराच्या सुमाराला. 

त्यांना हुसकावत पाळीव जनावरांच्या रक्षणासाठी वाघमारे यांनी आरडाओरडा केल्याने, त्यांपैकी एका बिबट्याने बबई वाघमारे यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने पंजाच्या निसटत्या फटक्‍याने त्यांची केवळ साडी फाटली. वाघमारे यांनी या घटनेची माहिती देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व संगमनेर वनविभाग-3 चे वनरक्षक सोनवणे व पठारे यांना फोन केला. मात्र, त्यांनी तो उचलला नाही, असे वाघमारे यांचे म्हणणे आहे. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

वनाधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने नानाभाऊ वाघमारे यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क केला. रात्री 12 च्या सुमारास वनमंत्र्यांनी त्यांची तक्रार ऐकून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आज पहाटे अडीचच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी दोन पिंजऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. या घटनेमुळे दहशतीखाली असलेल्या वाघमारे कुटुंबाला स्थानिक ग्रामस्थांनी मानसिक आधार दिला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people Called Forest minister Sanjay Rathod after attack of Leopard