‘पीएफ’च्या पैशातून दिले २३ टन पशुखाद्य

अण्णा काळे
गुरुवार, 23 मे 2019

दुष्काळी परिस्थिती असल्याने आम्ही मदत करायचा विचार करत होतो. आमच्या कडा गावाकडे पशुखाद्य वाटप करायचे नियोजन होते. मात्र, ‘सकाळ’मधील बातमी वाचली आणि विहाळ परिसरात साधारणपणे एक महिनाभर पुरेल एवढे पशुखाद्य वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या कामात पत्नी डॉ. नंदिनी हिचा मोठा पाठिंबा आहे.
- प्राचार्य भूषण पाटील, पुणे.

करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन पशुखाद्य दिले. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे पैसे त्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) काढले आहेत.

‘सकाळ’मधील ही बातमी वाचून पाटील यांनी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ विभागात दूरध्वनी करून विहाळ येथील जनावरांना पशुखाद्य देण्याची इच्छा बोलून दाखवली. मंगळवारी (ता. २१) विहाळ येथे भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येत्या ३० मे रोजी हे पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे.

प्राचार्य भूषण पाटील मूळचे कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथील असून, ते नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहेत. ग्रामीण जीवनाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाटील खूप हलाखीत जगले आहेत.

ते विनाअनुदानित महाविद्यालयात प्राचार्य आहेत समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने ते अशी मदत करीत असतात. यापूर्वी २०१३च्या दुष्काळात त्यांनी आष्टी भागात पशुखाद्य वाटप केले होते. त्या वेळी त्यांनी बॅंकेतून कर्ज काढले होते.

‘सकाळ’ची बातमी वाचून प्राचार्य भूषण पाटील यांनी स्वतःच्या ‘पीएफ’मधील पैसे काढून जनावरांसाठी पेंड देण्याचा निर्णय घेतला. यात ‘सकाळ’ची विश्‍वासार्हता किती मोठी आहे, हेच दिसून येते. आम्ही ग्रामस्थ पाटील यांचे आभारी आहोत. 
- आदिनाथ देवकते, विहाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PF Money Cattle Food Bhushan Patil Motivation Initiative