खळबळजनक ! फिर्यादी मुलानेच केला साथीदारांच्या संगनमताने वडिलांचा निर्घृण खून; संजय काळे खून प्रकरणाचे 24 तासांत उकलले पोलिसांनी गूढ 

Madha Murder
Madha Murder

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे (वय 55) यांच्या निर्घृण खून प्रकरणी वडिलांचे वादग्रस्त चारित्र्य (बाहेरख्याली) असल्याने होणारी भांडणे तसेच त्यास वडील नेहमी घालूनपाडून बोलत असल्याच्या कारणावरून यातील फिर्यादी असलेल्या मुलानेच दोन साथीदारांशी संगनमत करून कट रचला व सुपारी देऊन तिघांनी मिळून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या खून प्रकरणाचे अवघ्या चोवीस तासांत गूढ उकलण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. या तीनही आरोपींना अटक करून मंगळवारी माढा न्यायालयासमोर हजर केले असता, न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या प्रकरणी आकाश संजय काळे (वय 20, रा. शिराळ (टें), ता. माढा), लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (वय 27), अल्लाउद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी (वय 33, रा. दोघेही सुर्ली, ता. माढा ) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी अधिक माहिती अशी, शिराळ (टें) येथील संजय काळे यांचा शनिवारी रात्री नऊ ते रविवारी सकाळी यादरम्यान अज्ञात कारणासाठी अनोळखी लोकांनी अज्ञात हत्याराने तोंडावर व गळ्यावर वार करून निर्घृण खून केला व शेवरे (ता. माढा) हद्दीतील उजनी कालव्याच्या बाजूस नेऊन अंगावर स्टेफनी ठेवून त्यांचा मृतदेह व टेम्पो जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात मुलगा आकाश संजय काळे याने फिर्याद दाखल केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. 

या गुन्ह्यातील मृताच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता, फिर्यादी व त्याच्या आईच्या सांगण्यामध्ये पोलिसांना तफावत आढळून आली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता, फिर्यादी आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली. वडील संजय काळे यांचे वादग्रस्त चारित्र्य होते. त्यावरून होणारी भांडणे, वडिलांच्या घालूनपाडून बोलण्याने तो कंटाळला होता. त्यामुळे लक्ष्मण बंदपट्टे व अल्लाउद्दीन उर्फ आलम बासू मुलाणी या साथीदारांशी संगनमत करून वडील संजय काळे यांच्या खुनाचा कट शनिवारी सायंकाळी टेंभुर्णी येथील एका हॉटेलमध्ये रचला. खून करण्यासाठी लक्ष्मण बंदपट्टे यास त्याकरिता रोख सात हजार रुपये दिले. यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या तिघांनी घरी येऊन अंगणामध्ये झोपलेल्या संजय काळे यांचा तलवार व कोयत्याने तोंडावर व गळ्यावर वार करून निर्घृण खून केला. रक्ताने माखलेली गादी व बेडशीटसह त्यांचा मृतदेह टेम्पोमध्ये टाकला. नंतर टेम्पो आडमार्गाने शेवरे येथील उजनी कालव्याच्या बाजूस नेऊन मृतदेहावर स्टेफनी ठेवून डिझेल टाकून जाळला. तसेच टेम्पो पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिघेही घरी गेले. पोलिस चौकशीमध्ये आकाश काळे याने खून केल्याची कबुली दिल्यानंतर यातील आरोपी लक्ष्मण बंदपट्टे यास सुर्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्लाउद्दीन ऊर्फ आलम मुलाणी (रा. सुर्ली) यास पुणे येथून रात्री उशिरा ताब्यात घेतले. या तीन आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. 

खुनाचे गूढ यांनी उकलले 
संजय काळे यांचा खून कोणी, कोणत्या कारणासाठी केला? याचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, सहाय्यक पोलिस फौजदार अशोक बाबर, हवालदार अभिमान गुटाळ, पोलिस नाईक दत्ता वजाळे, धनाजी शेळके, पोलिस कॉन्स्टेबल विनोद पाटील, बाळासाहेब चौधरी, सायबर सेलचे अन्वर आतार यांनी खुनाचे गूढ उकलले. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com