कचरामुक्‍तीसाठी आराखडा करा - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 4 January 2020

नदी स्वच्छतेवर भर द्यावा - आदित्य ठाकरे
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की कचरामुक्त शहरे झाल्यास शहरांचे सौंदर्य वाढेल. शहरातील स्वच्छतेबरोबर नद्यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात यावा. शहरी जंगल वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मियावाकी पद्धतीने उद्याने उभारावीत. ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दल निर्माण करावेत. नागरिकांच्या तक्रारींसाठी ऑनलाइन पद्धती वापरण्याची सूचना त्यांनी केली.

मुंबई - कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एकसंघ काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने ठाकरे यांनी राज्यातील महापालिका आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. 

"ते' सावरकर भाजपला मान्य आहेत का? : काँग्रेसचा प्रश्न

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानाकंन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ व सुंदर रहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे असा मनोदय व्यक्‍त केला. कचरामुक्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plan for waste relief uddhav thackeray