मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच प्लास्टिकचे ग्लास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

वन महोत्सव 2018 राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम कल्याणमधील वरप गाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्य काही मंत्री, समाजसेवक, कार्यकर्ते यांच्या हस्ते पार पडला. 

मुंबई : एकीकडे प्लास्टिक बंदी लागू करणारे सरकार सर्वसामान्यांकडून दंड आकारून न भरल्यास कारावासाची शिक्षा असा नियम लागू करत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या कार्यक्रमात चक्क पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचे दिसून आले.

वन महोत्सव 2018 राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम कल्याणमधील वरप गाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्य काही मंत्री, समाजसेवक, कार्यकर्ते यांच्या हस्ते पार पडला. या वेळी 50 कोटी वृक्ष लावण्याची संकल्पना असल्याचे वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सांगितले. परंतु या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारने राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू केली असून, नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक बाळगणाऱ्यांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच प्लास्टिक वापरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: plastic glass use in CM Devendra Fadnavis programme