प्लॅस्टिकचा मानवी शरीरात प्रवेश

प्लॅस्टिकचा मानवी शरीरात प्रवेश

प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. प्लॅस्टिक पोटात जात असल्याने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना दिवसाआड वाचनात येतात. आता मानवी शरीरही प्लॅस्टिकच्या आक्रमणाला बळी पडण्याची चिन्हे असून, आठवडाभरात ५ ग्रॅम तर वर्षाला २५० ग्रॅम प्लॅस्टिक पोटात जात असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. प्लॅस्टिकचे संकट आता आपल्या आसपासच नव्हे तर शरीरातही शड्डू ठोकून उभे आहे. येत्या काळात ठोस उपाययोजनांसह नियोजन केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार, याबाबत तीळमात्र शंका नाही.

वर्ल्ड वाइड फंड आणि ऑस्ट्रेलियातील न्यू कासल विद्यापीठाने याविषयी पुढाकार घेऊन जगभरात ५० ठिकाणी मायक्रो प्लॅस्टिकचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचे सर्वेक्षण केले. यातून पुढे आलेले निष्कर्ष मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. विविध माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे २ हजार प्लॅस्टिकचे कण शरीरात जातात. मानवाचे सरासरी वय ६० वर्षे गृहीत धरल्यास त्यावेळी त्याने अठरा किलो प्लॅस्टिक पोटात साठवलेलं असेल. पोटामधील इंद्रियांना बाहेरील अतिशय लहान घटकही चालत नाही. या कणांचा शरीर जोरदार विरोध करते. जर पोटात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जाणार असेल तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल, याची कल्पनाच न केलेली बरी.  

कॅरीबॅगचा वापर वाढल्यापासून प्लॅस्टिकचा फास मानवाच्या गळ्याभोवती आवळला जात आहे. प्लॅस्टिक टिकाऊ असल्याने त्याचा वापर वाढला पण ते कुजत नाही आणि विघटितही होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर संपताच त्या जमेल तिथे फेकून दिल्या जातात आणि त्यांचे कधीही न संपणारे ढीग जमा होतात. गेल्या दहा वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि छोटी पाकिटे यांनी हा धोका अधिक गंभीर करून टाकला आहे. भारतात दररोज १ कोटी पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, तर १० कोटी छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकून दिली जातात. त्यांचे पुन्हा काहीच होत नाही. ही पाकिटे आणि बाटल्या कुजत नाहीत, नासत नाहीत. आहे त्या अवस्थेत पडेल तिथे पडून राहतात. गायी-म्हशींच्या खाण्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात आणि त्यांच्या पोटात जातात. त्यांचे परिणाम गायी-म्हशींच्या शरीरावर तर होतातच; परंतु त्यांच्या दुधांमधून तसेच दुधाच्या पिशव्यांमधूनही मानवी शरीरात प्लॅस्टिक पोचत आहे.

कोणत्याही शहरातून फेरफटका मारला तर जागोजागी कॅरीबॅग, निरनिराळ्या पॅकिंगसाठी वापरलेले विविध प्रकारचे प्लॅस्टिक, वापरून टाकलेले पेन, संगणक, टेप, सिडीज, गुटख्याची पाकिटे यांचे ढीग दिसायला लागतात. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांत, गटारीत, कचऱ्याच्या कुंड्यांच्या आसपास, अनेक हॉटेलांच्या तसेच हॉस्टेल्सच्या पिछाडीला या प्लॅस्टिकच्या ढिगांचे दृश्‍य पाहायला मिळते. रेल्वेस्थानक, बसस्टॅन्ड, पर्यटनाची ठिकाणे अशा ठिकाणीही हेच दृश्‍य दिसते. घरातले शिळे, खरकटे प्लॅस्टिकच्या पिशव्यात घालून त्या पिशव्या आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकून दिल्या जातात. म्हणजे न कुजणाऱ्या पिशव्याच केवळ पडलेल्या आहेत असे नाही तर त्यांच्यासोबत हे अन्नही आहे. त्यातून काय होत असेल याची कल्पनाही येणार नाही.

काय आहे प्लॅस्टिक?
कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुद्ध करून घ्यावे लागते. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लॅस्टिकची निर्मिती होते. प्लॅस्टिक साधारणपणे उच्च आण्विक द्रव्यमानाचे सेंद्रिय पॉलिमर्स असतात. त्यामध्ये अन्य घटकही असतात. ते सहसा कृत्रिम असतात. सामान्यत: पेट्रोकेमिकल्समधून मिळतात.

२०५० पर्यंत तिप्पट होणार
जागतिक पातळीवर प्रतिवर्षाला ३३० दशलक्ष टनांपेक्षा अधिक प्लॅस्टिकची निर्मिती होते. हा वेग लक्षात घेता २०५० पर्यंत प्लॅस्टिक निर्मिती तिपटीने (सुमारे एक हजार दशलक्ष टन) वाढण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

सोयीसाठीच्या शोधाने केली गैरसोय
मानवाने न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे प्लॅस्टिक हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे ऱ्हास होत नाही, तसेच तो नष्टही करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लॅस्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगापुढे उभी ठाकली आहे.    

प्लॅस्टिक वेस्ट आयात
देशात कमी प्रतीचे किंवा विघटन न होणारे प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरात येते. यात भर पडली आहे ती परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची (प्लॅस्टिक वेस्ट). काही वस्तू तयार करण्यासाठी हा कचरा आयात केला जातो. आयात केल्या जाणाऱ्या या कचऱ्यामुळे समस्या आणखी उग्र होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

स्ट्रॉ टिकतो १०० वर्षे 
तुम्ही हॉटेलमध्ये बसला आहात. प्लॅस्टिक स्ट्रॉ तोंडात घेऊन काहीजण थंड तर काही गरम पेयपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. पेय संपल्यानंतर स्ट्रॉ फेकले जातात. क्षणभर विचार करा, अतिशय क्षुल्लक वाटणारा हा प्लॅस्टिकचा स्ट्रॉ पुढील १०० वर्षे असाच राहणार आहे. विघटन होत नसल्यामुळे किंवा नष्ट होत नसल्याने असे दररोज फेकले जाणारे लाखो स्ट्रॉ जमा होऊन किती जागा व्यापणार, किती कचरा होणार? याची कल्पनाच न केलेली बरी.

निचरा होणार का?
आपण खात असलेल्या अन्नपदार्थांपासून ते वापरत असलेल्या कपड्यांवरही प्लॅस्टिकने आपली छाप सोडली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, सध्या पृथ्वीतलावर जेवढे प्लॅस्टिक आहे त्याच्या निचऱ्यासाठी ४५० ते १००० वर्षे लागू शकतात. काही जणांनी प्लॅस्टिक कुजून नष्ट होणार नसल्याचा दावा केलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com