#plasticBan दूध पिशव्यांबाबतचे धोरण अधांतरीच! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - "आरे'वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे. 

प्लॅस्टिकबंदीतून दुधाच्या पिशव्यांना वगळण्यात आले आहे; मात्र या पिशव्या ग्राहकांकडून परत घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील. सरकारच्या या आदेशाची सुरवात सरकारी दूध वितरक कंपनी "आरे'ने केली आहे. ग्राहकाकडून अतिरिक्त 50 पैसे वसूल करण्यात येणार आहेत. ग्राहकाने ही पिशवी परत केल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत, असा नियम "आरे'ने केला आहे. त्यासाठी प्रत्येक पिशवीची नोंद ठेवण्यात येत आहे. इतर दूध पुरवठादारांनी या प्रक्रियेला अद्याप सुरवात केलेली नाही. दुधाचे वितरण पूर्वीसारखेच सुरू आहे. विक्रेत्यांनीही अतिरिक्त 50 पैसे अनामत घेतलेली नाही. ग्राहकाकडून 50 पैसे घेऊन ते नंतर परत करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असा दावा कृती समितीने केला आहे. त्यामुळे सरकारचे हे धोरणच अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

दुधासाठी वापरण्यात येणारी पिशवी 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाड आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर सरकारसोबत बैठक झाली होती. त्यानंतर कोणतेही लेखी आदेश मिळालेले नाहीत. तूर्तास दूध वितरणाची व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू आहे. 50 पैसे आकारून त्याचा परतावा देणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. 
- विनायक पाटील, अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती 

Web Title: #plasticBan Milk bags Policy