दीडशे विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मंगरुळ (ता. जळकोट) : जिल्हा परिषदेच्या मंगरूळ (ता. जळकोट) येथील प्राथमिक शाळेतील सुमारे 141 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली असून, त्यांना वाढवणा (ता. उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. शासनाच्या योजनेअन्वये या शाळेतील पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. 4) दुपारी खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांचा आकडा 141 पर्यंत गेला. शिक्षक, सरपंच महेताब बेग व ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने विद्यार्थ्यांना वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. 

विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य अधिकारी बी. एल. कानवटे यांनी सांगितले. 
दरम्यान, खिचडीत अळ्या आढळल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले होते. त्यांच्या तक्रारीकडे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी लक्ष दिले असते तर हा प्रसंग ओढवला नसता, असा आरोप पालकांनी केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच बेग यांच्यासह पालक, ग्रामस्थांनी केली आहे. 

विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झालेली नाही. चौकशी करून माहिती देण्यात येईल. 
- एन. व्ही. मठपती, मुख्याध्यापक. 

विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे शिक्षक, मुख्याध्यापकांनी लक्ष दिले असते तर विषबाधेचा अनर्थ टळला असता. 
- महेताब बेग, सरपंच 
 
Web Title: Poisoning to 150 students