‘कुत्ता’चे परप्रांतीय ‘शिकारी’ अखेर जाळ्यात! 

‘कुत्ता’चे परप्रांतीय ‘शिकारी’ अखेर जाळ्यात! 

मुंबई - परप्रांतांतून महाराष्ट्रात येणाऱ्या ‘अल्प्रोझोलम’ या झोपेच्या गोळ्यांना नशेकऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी ठेवलेल्या सांकेतिक नावाच्या ‘कुत्ता गोळी’चे शिकारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कुत्ता रॅकेटमधील आठ जणांना पोलिसांनी नाशकात बेड्या ठोकल्याने नशिल्या औषधांची तस्करी करणाऱ्या राज्यातील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

सामाजिक स्वास्थ्य बिघडवून मुलांच्या आणि तरुणांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘कुत्ता’ गोळीच्या विक्री करणा-या रॅकेटचा राज्यात वावर असल्याचे वृत्त ‘सकाळ’ ने १५ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे अन्न व औषधी प्रशासन खडबडून जागे झाले. या विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. या अनुषंगाने राज्यातील पहिली कारवाई नाशिक जिल्ह्यातील मालेगावला जिल्हा प्रशासनाने करून परराज्यांतील आठ जणांची टोळी रंगेहात पकडून त्यांच्या विरोधात अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा नोंदवला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी मेडिकल दुकानांची एकाच वेळी झाडाझडती करण्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या मालेगाव व नाशिकच्या अधिका-यांना आदेश दिले.                        

‘कुत्ता’ नावाने परिचित ‘अल्पोझोलम’ ही झोपेची गोळी तरुणांसह मुलामध्ये लोकप्रिय झालेली आहे. ही गोळी गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात छुप्यामार्गाने विक्रीला आणली जात असल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उजेडात आणले. या गोळीची व अँडीसीव्ह बॉण्डची किंमत २५ ते ६० रुपये, तर झिंग आणणाऱ्या नशिल्या लिक्विड औषधाची किंमत ८० ते १०० रुपये इतकी आहे. कमी किमतीत नशा होत असल्याने या अमली पदार्थाचा ट्रेंड राज्यातील सीमावर्ती नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, पालघर, ठाणे, जळगाव, भुसावळ अकोला, अमरावती आदी मध्यम व छोट्या शहरातील झोपडपट्टी भागात जोरात आहे. नाशिकच्या कारवाईमुळे राज्यात या गोळ्यांची विक्री करणा-या व तिचे सेवन करणा-यांत खळबळ उडाली आहे.

बालकांना आणि तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणा-या संधिसाधू गल्लाभरूंच्या मुसक्‍या नाशिक जिल्हा प्रशासनाने वेळीच आवळण्याची कारवाई केली, ती निश्‍चितपणे स्वागतार्ह आहे. या कारवाईचा आदर्श घेत अन्य जिल्ह्यांनीही अशी धडक मोहीम राबविल्यास या अनिष्ट प्रवृत्तीच्या नांग्या ठेचल्या जातील. 
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक

शाळकरी मुलांना व युवकांना व्यसनाच्या अधीन लावणाऱ्या या टोळीवर कारवाई करण्यात यश आले आहे. राज्यात कुठेही अशा प्रकारचा गोरखधंदा सुरू असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. 
- गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com