
रामदास कदमांना विधानभवनात प्रवेश नाकारला, पोलिसांनी गेटवरच रोखलं
मुंबई : रामदास कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) शिवसेनेचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्यावर आरोप केले होते. तेव्हापासून रामदास कदम चांगलेच चर्चेत आहेत. आज हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2021) तिसऱ्या दिवशी ते विधानभवनात जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. त्यानंतर काही काळ त्यांना गेटवरच ताटकळत राहावं लागलं.
हेही वाचा: अनिल परबांचा शिवसेनेला संपवण्याचा डाव - रामदास कदम; पाहा व्हिडिओ
सध्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे (Maharashtra Omicron Cases) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनासाठी फक्त आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांनाच विधीमंडळ परिसरात प्रवेश दिला जात आहे. पोलिसांनी गेटवरच रामदास कदम यांना कोरोना चाचणीबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केल्यानंतर रामदास कदमांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यानंतर शेवटी पोलिसांनी त्यांना विधानभवनात प्रवेश दिला.
गेल्या आठवड्यात रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील या वादाकडे लक्ष द्यावं, अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वेळ दिली तर आपल्या मनातील खदखद त्यांना बोलून दाखवू, असंही रामदास कदम म्हणाले होते. मात्र, ठाकरेंनी अद्यापही त्यांना वेळ दिली नाही. तसेच अनिल परब हे शिवसेनेतील मोठे मंत्री आहेत. आता रामदास कदमांनी त्यांच्यावर आरोप केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Web Title: Police Denied Entry To Shivsena Ramdas Kadam In Vidhavbhavan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..