Police Recruitment : राज्यात पोलिसांच्या दहा हजार जागा भरणार - देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment 10 thousand police posts Devendra Fadnavis mumbai

Police Recruitment : राज्यात पोलिसांच्या दहा हजार जागा भरणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य पोलिस दलातून २०२२ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार जागांची मागणी पोलिस महासंचालकांकडून करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला आज दिल्या. फडणवीस यांनी गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक आज घेतली. त्या बैठकीत त्यांनी विविध कामांचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सरकारने २०१९ मध्ये जाहीर केलेली ५ हजार २९७ शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे, तर २०२० मध्ये करण्यात येणाऱ्या ७ हजार २३१ पदांसाठी पोलिस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरू आहे.

त्याचप्रमाणे २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार जागांची मागणी पोलिस महासंचालकांकडून करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबतच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. मुंबई मध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्वं पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे सुरू असलेले काम येत्या एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी या वेळी दिल्या.