Big Breaking : राज्यात १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती; गृहमंत्र्यांची घोषणा

टीम ई सकाळ
Monday, 11 January 2021

गृह विभागाने २०१९ मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबवली होती.

नागपूर : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. तसेच राज्यातील पोलिस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू पोलिस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अनिल देशमुख यांनी सोमवारी केली आहे.

पहिल्या टप्प्यात ५,३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबवली होती. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

नक्की वाचा - भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

मराठा संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घोषणेनंतर पोलिस भरती प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे निश्चित झाले असले तरी मराठा संघटना याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police recruitment for 12,538 posts in the state Anil deshmukh