भंडारा रुग्णालय आग : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबाबत समोर आली धक्कादायक माहिती

केवल जीवनतारे
Monday, 11 January 2021

भंडारा जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणामुळे दहा चिमुकल्यांचा जीव गेला. हे मृत्यूचे तांडव टाळता आले असते. परंतु, आउट बॉर्न युनिटचे दार बाहेरून बंद असल्याची तक्रार या नवजात शिशूंच्या मातापित्यांनी केली आहे.

नागपूर : शासकीय रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर व्यवसायरोध भत्ता घेत नसल्यास खासगी प्रॅक्टिस करता येते. मात्र, काही डॉक्टर सरकारी रुग्णालयाला कमी वेळ देऊन खासगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देत असल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, भंडारा जिल्हा रुग्णालयातील बरेच डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, यांना कुणीच जाब विचारत नाही. यामुळेच सार्वजनिक आरोग्यसेवेतील रुग्णसेवेचा दर्जा ढासळला आहे.

हेही वाचा - काचाच्या भिंतीतून बघितला मुलीचा चेहरा; ‘बेबी ऑफ सुकेशनी आगरे’ असे उच्चारले अन्हृ दयाचा ठोका चुकला

भंडारा जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणामुळे दहा चिमुकल्यांचा जीव गेला. हे मृत्यूचे तांडव टाळता आले असते. परंतु, आउट बॉर्न युनिटचे दार बाहेरून बंद असल्याची तक्रार या नवजात शिशूंच्या मातापित्यांनी केली आहे. एका मातेने मात्र सहज बोलताना या डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस सुरू असल्याची माहिती दिली. येथील सारे डॉक्टर खासगी दवाखाने थाटून बसले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, यातील एका वरिष्ठ डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. येथील सहा ते सात डॉक्टरांचे खासगी दवाखाने सुरू असतात, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - साखरेला येणार ‘अच्छे दिन’; खाद्य तेल, तांदूळ स्थिरावले

एका डॉक्टरचा जेल रोडवर, दुसऱ्याचा खात रोडवर खासगी दवाखाना असल्याची माहिती दिली. याशिवाय दुसऱ्या एका डॉक्टरने मुस्लिम लायब्ररीजवळ दवाखान्याचे दुकान लावले आहे. दुसऱ्या एका डॉक्टरने तकिया रोडवर दुकान थाटले आहे, तर तिसऱ्याने जे. ए. (जकातदार) शाळा येथे खासगी दवाखाना सुरू केला आहे. शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करायची नसेल त्यांच्यासाठी पूर्वी मूळ पगाराच्या २५ ते ३५ टक्के व्यवसायरोध (नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स) दिला जातो. काहींची स्वत:ची खासगी रुग्णालये आहेत, तर काही जण इतरांच्या खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत. यामुळे शासकीय रुग्णालयाच्या 'ओपीडी'च्या वेळेत न पोहोचणे. विशिष्ट रुग्णांनाच तपासणे. उशिरा येऊन लवकर जाणे. रुग्णालयाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिससाठी निघून जाणे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आपल्या रुग्णालयामध्ये वळविणे आदी प्रकार वाढत असल्याचे चित्र शहरापासून तर जिल्हास्तरावर बघायला मिळत असते. 

हेही वाचा - दूध बी पाजू नाई दिलं अन् मायी पोरगी उपाशीच मेली जी;...

आरोग्य उपसंचालकांचा फोन नुसताच खणखणतोय -
भंडारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिससंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन नुसताच खणखणत होता. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांची त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhandara government hospital doctors work also in private hospital