पोलिस कर्मचाऱ्याने कचऱ्यातून फुलवली हिरवाई

नीला शर्मा 
Tuesday, 23 June 2020

पाण्याच्या बाटल्यांमध्ये डोलताहेत फुलझाडे 

 

नाशिकच्या पाथर्डी फाटा पोलिस चौकी परिसर आता छोट्या फुलझाडांनी बहरला आहे. कोविड एकोणीस संदर्भातील बंदोबस्ताबरोबरच येथील सचिन जाधव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा परिसर सुशोभित केला आहे. निरपेक्ष सामाजिक कार्याचा हा वस्तुपाठ आहे. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

पाथर्डी फाटा, युनिट क्रमांक तीन, नाशिक या पत्त्यावरील पोलिस चौकीच्या परिसराचा नुकताच कायापालट झाला आहे. पोलिस नाईक सचिन जाधव यांनी ही किमया केली आहे. ते म्हणाले, " लॉकडाउनच्या काळात येथून बरेच कामगार आपापल्या गावाकडे गेले. पायी जाणाऱ्या या लोकांची तहानभूक भागवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्यांना अन्नपदार्थांची पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिल्या. या भागात त्यांनी टाकलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांचा भरपूर कचरा विखुरला होता. ती घाण बघवेना म्हणून मी त्या बाटल्या गोळा केल्या. मधून थोडा भाग कापून, त्यांत माती भरून फुलझाडे लावण्यासाठी तयारी करत होतो. माझे वरिष्ठ आणि सर्व सहकार्‍यांनाही ही कल्पना आवडली. प्रत्येकाने हातभार लावला. जुन्या तारा, वायरींपासून हुक तयार करून या बाटल्यांना जोडले. त्या आधारे दोनशे तीस बाटल्या बॅरिकॅडच्या जाळ्यांना अडकवल्या. रोज पाणी घालून ही रोपे वाढवली. हे करताना मनावरील सर्व ताण नाहीसा झाला. "

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाधव यांनी असेही सांगितले की, पोलिस खात्यातील माझ्या सेवेला वीस वर्षे झाली आहेत. सुरवातीला राज्य राखीव पोलिस दलात असताना कोणतीही वस्तू वाया जाऊ द्यायची नाही, टाकाऊतून टिकाऊ निर्माण करावे, हे शिकायला मिळाले. त्याचा उपयोग या उपक्रमात पुरेपुर झाला. या फुलबागेसाठी जवळच्या रोपवाटिकेचे मालक सागर मोटकरी यांनी बरीच रोपे दिली. काही रोपे परिचितांनी दिली. त्या वाटेने जाणारे एक नागरिक, महेंद्र उपासने यांनी आमच्याकडून सर्व माहिती विचारली आणि काही रोपे भेट म्हणून आणून दिली.  सोळा वर्षे पुण्यातील कार्यकाळातही मी संधी मिळेल तेव्हा वृक्षारोपण करत असे. वृक्षप्रेम आणि कचरा व्यवस्थापनाच्या भावनेतूनच ही फुलबाग फुलली आहे. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The policeman blossomed green from the garbage