
सोलापूर : आषाढीवारी दरम्यानच्या गर्दीचे नियोजन, सुरळीत वाहतुकीसाठी पंढरपूर शहरात भीमा नदीवर दोन पूल आवश्यक आहेत. जुन्या दगडी पुलाच्या जागेवर एक व विष्णूपद या ठिकाणी पूल झाल्यास मदत होईल. पंढरपूर विकास आराखड्यात हे पूल घेतले आहेत, परंतु आराखड्यात पूल करण्यासाठी वेळ जाईल. या पुलासाठी विशेष निधी मिळावा व पुढील आषाढीपूर्वी हे पूल वापरात येणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर हा विषय सांगितला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा स्नान आणि वाळवंट महत्त्वाचे आहे. आषाढी दरम्यान चंद्रभागा स्नान व वाळवंटात भाविकांचा वावर होण्यासाठी भीमा नदीतील पाण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. उजनी धरणाची क्षमता पाहता या धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वारी काळात नियंत्रण आणणे सहज शक्य आहे. नीरा नदीवरील पाण्यावर मात्र सध्या कोणतेही नियंत्रण नाही. या नदीवर असलेल्या धरणांची क्षमता पाहता हे नियंत्रण मिळविणे कठीण आहे. नीरेच्या पाण्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी या नदीवर बॅरेज आवश्यक आहे. हा मुद्दादेखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. यंदा झालेल्या आषाढी वारीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या संदर्भातील सूचना पंढरपुरातील पत्रकार, पालखी सोहळा प्रमुख यांच्यासह भाविकांकडून घेतल्या होत्या. त्यांनी ४३ सूचना केल्या होत्या. त्यापैकी ३८ सूचनांची आम्ही अंमलबजावणी केली.
यंदाच्या आषाढीनंतरही सुधारणांबाबत आम्ही सूचना घेतल्या आहेत. साधारणतः १२ नवीन सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार बदल केले जातील. यात्रा नियोजनाचे डॉक्युमेंटेशन करून नवीन अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती देण्याचे नियोजन आहे. वारीदरम्यान पंढरपुरातील वीज पुरवठा यंत्रणा सक्षमपणे काम करावी, या दृष्टीनेही नियोजन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
मैत्रीचे नाते आले उपयोगी
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांमधील समन्वय महत्त्वाचा असतो. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि मी आम्ही तिघे जुने मित्र आहोत. आमच्यात असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे आमच्यातील नियोजन आणि समन्वय प्रभावी होता. याचा मोठा फायदा आषाढी वारी यशस्वी करण्यात झाल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
‘अशी’ सुचली ’टु-जी’ मोबाईलची आयडिया
आषाढी वारी दरम्यान संवादासाठी प्रशासनाने यंदा टु-जी कार्डवर चालणारे साधे मोबाईल (अँड्राईड नसलेले) वापरले. त्यामुळे अधिकारी आणि क्षेत्रिय कर्मचारी यांच्यात प्रभावी संवाद झाला. आषाढीतील ही आयडिया नाशिकच्या कुंभमेळाव्यात वापरणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. बैठकीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने ही टु-जिची आयडिया सुचविली. ही आयडिया यशस्वी होते की नाही, हे पाहण्यासाठी आम्ही ३५ मोबाईल खरेदी केले. देहू व आळंदी येथून पालखी सोहळा निघताना त्या गर्दीत टु-जी मोबाईल आणि वॉकीटॉकी वापरून पाहिले. त्या गर्दीतही वॉकीटॉकीपेक्षा टु-जी मोबाईल प्रभावी चालल्याने पंढरपुरात हा प्रयोग केल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.